<
लस उपलब्ध नसल्याने जखमी महिलेची झाली फरफट
कासोदा प्रतिनिधी ( सागर शेलार ) :- एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीजच्या लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे कुत्र्याने चावा घेतल्यावर जायचे कुठे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर उभा राहिला आहे. शासकीय दवाखान्यात लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाने यावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे.
दि. १३ फेब्रुवारी रोजी येथील भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुरेश ( छोटू ) क्षीरसागर यांची पत्नी अनिता क्षीरसागर या महिलेला अंगणात कुत्र्याने चावा घेतला. तर त्या महिलेस नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे कुत्रा चावल्याची लस उपलब्ध नसल्याने ग्रामीण रुग्णालय ते जिल्हा रुग्णालय अशी त्या रुग्णाची फरफट झाली. रेबीज लस उपलब्ध नसल्यामुळे कासोद्याहून जळगावपर्यंत आलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात लस उपलब्ध असल्याने उपचार घेता आला. परंतु ३५००० हजार च्या वर लोकसंख्या असलेल्या कासोद्या गावात लस उपलब्ध नसल्यामुळे करायचे काय असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थ व रुग्णांसमोर निर्माण झाला आहे . कायाकल्प योजनेमध्ये राज्यात बहुमान मिळविणाऱ्या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा हा बोजवारा वेदनादायक आहे. भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये तर होताच परंतु महाविकास आघाडीच्या राजवटी मध्येही हा बोजवारा असल्याने सर्वसामान्यांच्या आरोग्य सुविधांची हेळसांड होत असल्याचे वारंवार समोर येत आहे . अनेक प्रकारची औषधे प्राथमिक व ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाहीत . त्यामुळे रुग्णांची फरफरड होत आहे . खुद्द मा. जि.प.अध्यक्षा यांच्याच गावी , कुत्रा , मांजर , माकड चावल्याने होणाऱ्या रेबीज आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी टोचण्यात येणारे लसेस , इंजेक्शन कासोद्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व गरीबांना पैश्यांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. मा.जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.. ऊज्वलाताई या कासोद्याच्याच असून कासोदा वाशीयांसाठी ही शोकांतिका आहे . केंद्रातच नव्हे तर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आहे . तरीही जिल्ह्यातील बऱ्याच रुग्णालयात विविध प्रकारच्या लसेस उपलब्ध नाहीत .
मागील वर्षीही आडगाव येथील महाजन यांना सर्पदंश झाला असता. लस उपलब्ध नसल्याने त्यांनाही आपला जीव गमवावा लागला होता.अजून किती जिव घेणार याकडे आरोग्य विभागाने व प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
पिसाळलेला कुत्रा चावल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातच नव्हेतर तालुक्यावरही ती लस उपलब्ध नाही, जळगांव येथेच जिल्हा रुग्णालयात लस उपलब्ध आहे. तेथून लस टोचुन आल्यानंतर चा उपचार येथेच करता येत असल्याचे कासोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ वाघ यांनी बोलतांना सांगितले .
त्या लसेस तालुक्याचाच ठिकाणी मिळण्यासाठी प्रशासनाने , व तालुक्यातील डॉकटर्स यांनी उपाय योजना कराव्यात अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत.
या महिन्यात १५ ग्रामस्थांना कुत्र्याने चावा घेतला म्हणून असलेल्या लस टोचल्या गेल्या आहेत.पुर्णतः लसेस संपल्या होत्या , वरती लसेस ची मागणी केली आहे .स्टोक येईपर्यंत जवळील रुग्णालयातुनलसेस उपलब्ध करून घेतली आहे.-कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. पृथ्वीराज वाघ