<
जळगाव- आयूक्त महिला व बाल विकास, पुणे यांच्या 31 जानेवारी 2020 च्या आदेशान्वये बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या यंत्रणांची व कायद्याची समाजास ओळख व्हावी व त्या दृष्टीने प्रचार व प्रसार होवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत बालकांच्या संरक्षाणासाठी असलेला कायदा पोचचावा या उद्देशाने महिला व बाल विकास विभाग, जळगाव यांचेकडून आयोजित जिल्ह्यातील बाल संरक्षणासाठी जनजागृती कृती आराखड्यास मंजूरी देण्यासाठी आज दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
बैठकीस उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, उप मुख्यकार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) श्री. तडवी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजसिंग परदेशी, जिल्हा बाल संरक्षण विषयक काम करणाऱ्या विविधअशासकीय संस्थांच्या सदस्या, महिला व बाल विकास कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी संबंधितांकडून बाल लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 पोस्को, ग्राम बाल संरक्षण अन्वये जिल्ह्यात केलेल्या कार्यवाही आणि कारवाईंबाबत सविस्तर आढावा घेतला. विशेष करून जिल्ह्यातील बाल विवाहासंदर्भात संबंधित विभागांकडून सुरू असलेल्या कार्यवाही व कारवाईंवर भर देत जिल्ह्यातील वाड्या तांड्यांपर्यंत बाल विवाह करणे कायदेशिर कसे चुकीचे आहेत आणि तसे केल्यास होणाऱ्या कारवायांविषयी माहितीचा व्यापक प्रचार व प्रसार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी सर्व संबंधितांना दिल्यात.
प्रारंभी सदस्य सचिव जिल्हा बाल संरक्षण कक्ष तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव विजयसिंग पदरेशी यांनी बाल संरक्षण जिल्हा कृती आराखड्याचा नजिकच्या काळातील कार्यक्रम सादर करून बाल संरक्षण कक्षा कडून भविष्यात राबविल्या जाणाऱ्या विविध योजन आणि कार्यक्रमांची माहिती सादर केली.