<
जळगाव(प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या चिमुकल्यांनी पोवाडा सादर करून स्वराज्याच्या महत्त्वाच्या क्षणांची साक्ष घडविली. शिवाजी महाराजांचे कार्य पोवाड्याच्या माध्यमातून उलगडून दाखविले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचे कृतिशील आचरण केले तर सक्षम समाज घडू शकतो. विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे स्वराज्याविषयीचे कार्य समजावे यासाठी अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिली. शिवजन्मोत्सव पाळणा या उपक्रमाद्वारे शिवाजी महाराजांच्या जन्माचा प्रसंग साकारण्यात आला. तसेच अफजलखानचा वध हा रोमांचकारी प्रसंग नाटिकेतून दाखविण्यात आला. यावेळी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी पोवाड्यातून शिवशाही जागवली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मावळ्यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली होती. अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंपर्क अधिकारी रूपाली वाघ, सुर्किती भालेराव, सिमा पाटील, नाना सोनवणे व शाळेतील सर्व शिक्षकांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.