<
एमजीएम विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून पदवीधारकांचा गौरव
जळगाव - येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ९२ स्नातकांना आज पदवी प्रदान करण्यात आले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी प्रचंड जल्लोष केला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सन २०१४ च्या बॅचाा आज पदवी प्रदान सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नवी मुंबई येथील एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस.आर्वीकर, डॉ. माया आर्वीकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. चंद्रय्या कांते, होमीओपॅथीक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी बी पाटील, फिजीओथेरेपीचे प्राचार्य डॉ जयवंत नागुलकर, डॉ सचिन चौधरी, डॉ प्रिया देशमूख हे उपस्थित होते. पदवी प्रदान सोहळ्याच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याचा कानमंत्र दिला. तसेच माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सन २०१४ च्या बॅचमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पदक, प्रशस्त्रीपत्र, पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी व माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ९२ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे आनंदोत्सव साजरा केला. या सोहळ्याला टिपण्यासाठी विद्यार्थ्याचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.