<
जळगाव-(प्रतिनिधी)-एस.एस. मणियार विधी महाविद्यालय,जळगांव येथे डॉ. अण्णासाहेब जी.जी. बेंडाळे स्मृती प्रित्यर्थ 15 व्या राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे आयोजन शनिवार आणि रविवार दि. 22 व 23 फेब्रुवारी 2020 रोजी आयोजित करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये देशातील विविध घटक राज्यातून संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र न्यायालयीन अकादमी उत्ताणचे माजी सहसंचालक प्रमोद डी. आंबेकर यांच्या हस्ते होणार आहे. सदर उद्घाटन समारंभास जळगांवचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश जी. ए. सानप, कबचौउमवि जळगांवचे प्र-कुलगुरु प्रा. डॉ. पी. पी. माहुलीकर विशेष सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. तसेच समारंभास केसीई सोसायटीचे सचिव अॅड. एस. एस. फालक, केसीई सोसायटीचे सदस्य अॅड. सुनिल डी. चौधरी यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान के. सी. ई.सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड.प्रकाश बी. पाटील हे भूषविणार आहेत.
दोन दिवस चालणार्या या स्पर्धेचा समारोप आणि बक्षिस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. पी. भंगाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सदर कार्यक्रमास जळगांवचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश जी. ए. सानप, जळगांव जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. दिलीप एस. बोरसे, केसीई सोसायटीचे सहसचिव अॅड. प्रमोद एन. पाटील, महाराष्ट्र आणि गोवा बार काऊंसिलचे माजी सदस्य अॅड. विपीन बेंडाळे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान के. सी. ई. सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश बी. पाटील भूषविणार आहेत.
एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाची स्थापना 1970 साली झाली असून मागील 50 वर्षाच्या वाटचालित महाविद्यालयाने अनेक नामवंत न्यायधीश, वकील, उच्चपदस्थ अधिकारी घडविले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संस्थेकडून अनेक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक माग म्हणून महाविद्यालयात राष्ट्रीय आणि विद्यापीठ स्तरावरील अभिरुप न्यायालय स्पर्धेचे आयोजन केले जाते.
महाविद्यालयात मागील 15 वर्षापासून राष्ट्रीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांचे वडील व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाविद्यालयाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेमध्ये देशभरातील विविध विधी महाविद्यालयातून विद्यार्थ्यांचे संघ सहाभागी होतात. अशा स्पर्धामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाचे उपयोजन करण्याचे कौशल्य प्राप्त होते. त्याचबरोबर एक जबाबदार नागरिक म्हणून समाज व देशाबद्दलच्या कर्तव्याची जाणीव निर्माण होते. पर्यायाने उत्कृष्ट वकील बनण्यास मदत होते.
स्पर्धेत प्रथम येणार्या संघास फिरता चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम, द्वितीय येणार्या संघास फिरता चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम दिली जाते. तसेच वैयक्तिक उत्कृष्ट युक्तीवादांसाठी एका विद्यार्थ्यास आणि विद्यार्थीनीस अनुक्रमे उत्कृष्ट विद्यार्थी, वकील व उत्कृष्ट विद्यार्थीनी वकील म्हणून प्रत्येकी चषक, प्रमाणपत्र व रोख रकमेचे बक्षिस देऊन गौरविले जाते. शिवाय बेस्ट मेमोेेरियल म्हणून चषक, प्रमाणपत्र आणि रोख रकमेचे उत्तेजनार्थ बक्षिस एका महाविद्यालयाच्या संघास दिले जाते. तसेच प्रत्येक सहभागी संघास सहभाग प्रमाणपत्र दिले जाते. या स्पर्धेसाठी विविध राज्यातील अनेक नामवंत विधी महाविद्यालय, राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थी संघ सहभागी होत आहेत.
सदर कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी युवाकुमार रेड्डी, कार्यक्रम समन्वयक प्रा. विजेता सिंग, प्रा. दिपक क्षीरसागर, प्रा. जी. व्ही. धुमाळ यांनी दिली आहे.