<
जळगांव(प्रतिनीधी)- सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती जळगाव, गेल्या अठरा वर्षांपासून सर्वसमावेशक शिवजयंती जळगाव शहरात साजरी करत आहे. या वर्षी बदलत्या काळाशी सुसंगत अशी पर्यावरणपूरक व स्वच्छतेची संकल्पना राबवत शिवजयंती साजरी होत आहे. जळगाव शहरात होणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुतर्फा झाडे लावून ती झाडे जगविण्याची जबाबदारी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीने घेतलेली आहे. या प्रकल्पा शुभारंभ आज प्रातिनिधिक स्वरूपात वडाचे झाड लावून करण्यात आला. याप्रसंगी महोत्सव समितीचे अध्यक्ष मंगेश चव्हाण, उपाध्यक्ष व महापौर भारतीताई सोनवणे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, कार्याध्यक्ष करीम सालार, सचिव सचिन पाटील, माजी अध्यक्ष पुरुषोत्तम चौधरी, लीला भाऊ तायडे, मुकुंद सपकाळे, सुरेंद्र पाटील, सुरेश भाऊसाहेब पाटील, खुशाल चव्हाण, अश्फाक पिंजारी, समीर जाधव, भगवान शिंदे पाटील, एकनाथ पाटील यांच्यासह अनेक शिवप्रेमी कार्यक्रमाला हजर होते. संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये जळगाव मधील सर्वसमावेशक शिवजयंती बद्दल आकर्षण आहे. जळगाव शिवजयंती पैटर्न आता अनेक शहरात आता राबवला जातो आहे. याप्रसंगी सार्वजनिक शिवजयंती समितीच्यावतीने समन्वयक शंभू पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक व छत्रपती संभाजी महाराज चौक या चौकांचे सुशोभीकरण करण्यात यावे, यासाठी मनपाकडे निधी नसल्यास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन सदर चौकाचे सुशोभिकरण ताबडतोब करावे अशी मागणी केली. महापौर व मनपाने आकाशवाणी चौकाचे नामकरण राजमाता जिजाऊ असे करावे, आकाशवाणी चौक ते संभाजी चौक या मार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे, महेश चौक ते सिंधी कॉलनी या रिंग रोडला महात्मा फुले यांचे नाव द्यावे तर अजिंठा चौफुली ते रेमंड चौफुली या मार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे. अशी मागणी शंभु पाटिल यांनी केली आहे. गेल्या अठरा वर्षांपासून सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती गुलाल विरहीत, डीजे विरहित, धांगडधिंगा या सर्व बाबी टाळून दरवर्षी साडेसात वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पासून शोभायात्रेला सुरुवात करतात. यावर्षी देखील साडेसात वाजता शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. तरी सर्व शिवप्रेमींनी सकाळी साडेसात वाजता शोभा यात्रेसाठी स्टेडियमला जमावेअशी विनंती समितीच्यावतीने करण्यात आलेली आहे