<
प्रतिपंच्चद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ||शाहसूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ||
प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंदय होणारी अशी शाहजीराज्यांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे;असे सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याच्या स्थापनेचा संकेतच होता आणि या राजमुद्रेवर लिखित स्वरूपातच लोकांचे कल्याण असे स्पष्ट आहे; तर अशी राजमुद्रा असणारे राज्य व राज्यकर्ता प्रजेविषयी काय व कोणते विचार ठेवत असेल हे काही सांगायची गरज भासत नाही. शिवरायांचा प्रजाहितदक्ष राज्यकारभार बघायचा झाल्यास आपल्याला शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र यावर नजर टाकावी लागेल. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा असे. बरेच राजे असे होते की, ते प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असत; पण त्याकाळी असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. उत्तरेकडील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते. ते प्रजेवर जुलूम करत होते. या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. त्यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती. उघड-उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते राहायला सुरक्षित निवारा ही नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते, पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते.प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर. वतनासाठी ते एकमेकांशी भांडत आपापसात लढत. त्यात रयतेचे खूप हाल होत.या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंदाधुंदी माजली होती. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्यस्थापण्याचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले.भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्ताशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटीचा पराभव केला. न्यायचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले हे. स्वराज्य सर्व जातीधर्माच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू-मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधुसंतांचा त्यांनी सन्मान केला. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली, की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. शिवजी महाराजांनी आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर आणि योजनाबद्ध अविरत श्रमाने त्यांनी राजकीयदृष्ट्या स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी जनतेमध्ये देशभक्तीची भावना निर्माण केली. कौशल्य,चातुर्य आणि साहस या गुणांनी त्यांनी राजकीय,सामाजिक,आर्थिक आणि धार्मिक शक्ती स्वराज्य स्थापण्यासाठी एकत्रित केल्या. त्यामुळे ते आपल्या काळातील युगप्रवर्तक ठरले. महाराजांचे चारित्र साधेपणा, कनवाळूपणा, स्त्रियांबद्दल असणारा आदर, भक्तिभाव, त्यांची धार्मिक वृत्ती यामुळे महाराष्ट्राच्या तळागाळातील जनतेमध्ये महाराज अवतारी पुरुष असल्याची भावना निर्माण झाली होती. कारण महाराजांसारखा धर्मनिरपेक्ष राजा या देशात झालाच नाही. महाराज अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या. त्यांना अनेक भाषा आणि लिपी अवगत होत्या. आई-वडिलांनी केलेले स्वराज्यस्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर रुजलेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात चारित्र्य आणि सामर्थ्य, शील आणि पराक्रम यांचा समन्वय झाला होता. त्यांच्याकडे नेतृत्व, व्यवस्थापन, द्रष्टेपणा, राजकीय मुत्सद्देगिरी, मुलकी आणि लष्करी प्रशासनाविषयी चे प्रभावी धोरण, सत्य आणि न्याय यांवरील निष्ठा, सर्वांना समान वागणूक देण्याची वृत्ती, भावी गोष्टीचा आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन, नियोजित प्रकल्प तडीला तडीला नेण्याचे कौशल्य, संकटात खचून न जाता उफाळून येण्याचा निर्धार, सदैव जागृत राहण्याचा सावधपणा इत्यादी प्रकारचे असंख्य गुण होते. स्वराज्यावर जेव्हा जीवघेणे संकटे येत, तेव्हा सहकाऱ्याऐवजी वा त्यांच्यासह ते स्वतः त्या संकटांना भिडत त्यामुळे त्यांचे सहकारीही स्वराज्यासाठी प्राणार्पण करायला सिद्ध असत. अर्थात केवळ अशा मोठ्या संकटांना धैर्याने आणि निर्भयपणे सामोरे जाणे, एवढेच त्यांचे मोठेपण नव्हते. त्यांना आपल्या स्वराज्याला नैतिकतेचा आणि गुणवत्तेचा आधार द्यायचा होता. म्हणूनच महत्त्वाच्या गोष्टीप्रमाणे छोट्या-छोट्या गोष्टींच्या बाबतीतही त्यांनी संबंधितांना योग्य ते आदेश दिल्याचे आढळते. सैनिकांनी शेतकऱ्याच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नये, या अर्थाचा आदेश त्या दृष्टीने आदर्श आहे. ते स्वराज्याची उभारणी करताना बारीक-सारीक बाबींकडे किती लक्ष देत होते हे यावरून स्पष्ट होते. ते केवळ योद्धे नव्हते तर ते एका नव्या स्वतंत्र, नीतीमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार होते. त्यांची थोरवी सर्वांगीण आहे. शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली. न्यायदानात निःस्पृहता दाखवली. गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना समज दिली. सर्व धर्मांना समान लेखले. गुणवंतांचा गौरव केला, सर्वांबरोबरच त्यांनी आपल्या रयतेचीे जीवापाड काळजी घेतली. रयतेला आपल्या लेकराप्रमाणे मानणारे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज हे केवळ युगपुरुष नव्हते तर मानवतेचे उत्कृष्ट तत्त्वज्ञान सांगणारे आणि त्याप्रमाणे आचरण करणारे महात्मा होते वंदनीय थोर पुरुष होते. छत्रपती शिवाजी महाराज हे जसे दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते तसेच अत्यंत सूक्ष्म दृष्टीने राज्यकारभार करणारे प्रजाहितदक्ष राजेही होते.आणि एक आदर्श राज्यकर्ता सुद्धा होते. अशा या माझ्या राजास कोटि कोटि प्रणाम || –
मनोज भालेराव (शिक्षक)प्रगती विद्यामंदिर,जळगाव मो.नं.84214655