<
जळगाव-(जिमाका) – भुसावळशहरातील विविध विकासात्मक तसेच विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी भुसावळचे आमदार संजय सावकारे तसेच नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा घेतला. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी मंजूर कामे वेळेत पूर्ण करून प्रस्तावित कामांना प्राध्यान्याने सुरुवात करून ती विहित मुदतीत पुर्ण करावेत जेणे करून मंजूर अनुदानातच ती पुर्ण करता येतील.
भुसावळ शहरातील विकासात्मक तसेच प्रलंबित कामांमध्ये प्रामुख्याने भुसावळ क्रीडा संकुल, शहराजवळील खडका येथील सोलर प्रोजेक्ट, भुसावळ शहरातील अमृत योजना, शहरातील एल.ई.डी दिवे, गणपती विसर्जन मार्ग अंडर ग्राऊँड वायरिंग करणे, बँक समन्वय (मुद्रा लोन व इतर लोन बाबत) भुसावळ नगरपालिकेचे पेमेंट डिजीटल करणे, भुसावळ हद्दवाढ प्रलंबित प्रश्नांबाबत बैठकीत जिल्हाधिकारी यांनी आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या उपस्थितीत नगरपालिकेचे मुख्याधिकारी, विद्युत वितरण कंपनी, क्रीडा विभाग, लिड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक आदि अधिकारी आणि संबंधित विभागांच्या प्रतिनिधींकडून कामाच्या प्रगतीचा व अडी-अडचणींबाबत आढावा घेतला.
याप्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, भुसावळ विभागाचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, भुसावळचे तहसिलदार दिपक धिवरे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, तालुका क्रीडा अधिकारी मार्क धरमाडे, सहाय्यक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हर्षा बेहेरे, लिड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अरुण प्रकाश, आय.सी.आय.आय बँकेचे व्यवस्थापक मिलींद देशमुख, लेखाधिकारी सोनार, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) किरण देशमुख, भुसावळ नगरपालिकेच्या मुख्याधिकारी करूणा डहाळे तसेच नगरपालिका आणि विज वितरण कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आढावा बैठकीस संबंधित अधिकारी आणि प्रतिनिधींना सूचित केले की, भुयारी विद्युत तारा, केबल टाकण्यासाठी लागणाऱ्या संबंधित विभागांच्या परवानग्या तात्काळ घ्याव्यात, बँक अधिकाऱ्यांना नगरपालिकेचे डिजिटल पेमेंट आणि मुद्रा लोन मधे येणाऱ्या अडचणीत बँक अधिकारी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी जातीने लक्ष घालून लाभार्थ्यांना त्यांचा लाभ तात्काळ व विनासहाय कसा देता येईल याकडे लक्ष द्यावे.
याप्रसंगी आमदार संजय सावकारे तसेच नगराध्यक्ष रमण भोळे यांनी भुसावळ नगरपालिकेच्या प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क आणि सुसंवाद ठेवून कामे वेळेत पुर्ण करावीत अशा सुचना दिल्यात.