<
‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ ने महोत्सवाची होणार सुरुवात
जळगांव(प्रतिनिधी)- पद्मश्री भवरलाल जैन हे उद्योजकासोबतच कलाप्रिय व्यक्तिमत्व होते. साहित्य, संगीत, नाट्य यात विशेष रूची घ्यायचे, अशा भवरलाल भाऊंना नाट्य, साहित्य, संगीत, चित्रकला, नृत्य अशा कलेतून कलावंतांच्या वतीने आदरांजली वाहणारा भावांजली परिवर्तन कला महोत्सवाचे आयोजन संजिवनी फाऊंडेशन संचलित परिवर्तन संस्थेतर्फे दि. २१ ते २९ फेब्रुवारी या काळात आयोजित करण्यात आले आहे.
नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे प्रमुख म्हणून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिषभाई शाह, उद्योजक अनिलभाई कांकरिया, अमरभाई कुकरेजा व नंदलालजी गादिया यांची निवड करण्यात आली आहे. जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी भाऊंनी सदैव पुढाकार घेत कलेच्या पोषक वातावरणासाठी पाठबळ दिलं. परिवर्तन ‘भाऊंना भावांजली’ या कला महोत्सवाचे आयोजन गेल्या तीन वर्षापासून करीत आहे. नऊ दिवस चालणारा हा महोत्सव भाऊंच्या उद्यानातील एम्फी थिएटरमधे होत असून महोत्सवाची सुरवात आज शुक्रवारपासून होत आहे. पहिल्या दिवशी “तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल” हा वारकरी संप्रदायावर आधारीत संगीतमय कार्यक्रम, शनिवारी २२ रोजी महाराष्ट्रभर गाजलेल्या दोन एकांकिका “हलगी सम्राट” व “कस्टमर केअर” यांचे सादरीकरण होईल. २३ फेब्रुवारी रविवारी बासरीवादक योगेश पाटील यांच्या ४५ कलावंतांचा “वेणुत्सव” तर सोमवार २४ रोजी भवरलालभाऊ जैन यांच्या कार्याविषयी “मला कळलेले भाऊ” यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार २५ रोजी “कबीर और हम” हा अभिनव कार्यक्रम तर मंगळवार २६ रोजी “मी का लिहितो” याविषयावर चर्चासत्र होणार असून त्यात ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानीत भालचंद्र नेमाडे, कविवर्य ना. धों. महानोर, जेष्ठ लेखिका मेघना पेठे, कवी अजय कांडर, कवी अशोक कोतवाल, रंगकर्मी शंभू पाटील, रफिक सुरज सहभागी होणार आहेत. बुधवार २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनानिमित्त पुणे येथील महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित अभिवाचन स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त “जातस्य हि” हा कवितेचा कार्यक्रम, गुरुवार २८ फेब्रुवारी रोजी अपर्णा भट व शिष्यांचा “भावरंग भक्तीचे” हा शास्त्रीय नृत्यावर आधारित कार्यक्रम तर महोत्सवाचा समारोप परिवर्तन निर्मित “गांधी नाकारयचा आहे, पण कसा ? ” या अभिवाचनाने होणार आहे.
नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दि. २५ फेब्रुवारी पासून आर्ट गॅलरीमधे चित्र प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. दररोज सायंकाळी ६:३०भाऊंच्या उद्यानातील एम्फी थिएटरमधे जळगावकर प्रेक्षकांना नऊ दिवस उत्तम अशा कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. या महोत्सवासाठी प्रेक्षकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन महोत्सव प्रमुख अनिष शाह, अमर कुकरेजा, नंदलाल गाडीया व अनिल कांकरिया यांनी केले आहे. तर महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी पुरुषोत्तम चौधरी, नारायण बाविस्कर, होरिलसिंग राजपूत, वसंत गायकवाड, मंजुषा भिडे, सुदिप्ता सरकार, शिरीष बर्वे , डॉ. किशोर पवार, मिलिंद काळे, अनंत जोशी, विनोद पाटील, प्रमोद माळी मंगेश कुलकर्णी, मोना निंबाळकर, प्रवीण पाटील, राहुल निंबाळकर, सोनाली पाटील, अंजली पाटील, विजय जैन, राजू बाविस्कर, नितीन सोनवणे, अक्षय नेहे, नीलिमा जैन, रविंद्र डहाके, विकास मलारा, हर्षदा कोल्हटकर, अभिजीत पाटील, बिना मलारा, सुनीता दप्तरी, प्रतीक्षा कल्पराज, योगेश चौधरी, चंद्रकांत इंगळे, प्रभाकर बडगुजर आदी यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.