<
मुंबई/दिल्ली:
केंद्रातील मोदी सरकारनं काल, शुक्रवारी अर्थसंकल्प मांडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मार बसला आहे. मुंबई, दिल्लीसह अन्य महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. मुंबईत पेट्रोल दर लिटरमागे २.४० रुपयांनी वाढून ७८.५७ रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलच्या दरातही लिटरमागे २.५० रुपयांची वाढ होऊन ६९.९० रुपयांना मिळत आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलवरील अबकारी शुल्क, रस्ते अधिभारात लिटरमागे प्रत्येकी एक रुपयाची वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परिणामी पेट्रोल, डिझेलच्या दरांत आजपासून वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर काल ७६.१५ रुपये प्रतिलिटर होते, आज त्यात २.४२ रुपयांची वाढ होऊन ७८.५७ रुपयांवर पोहोचले आहे. तर डिझेलच्या दरात २.५० रुपयांची वाढ होऊन ते ६९.९० रुपयांवर पोहोचले आहे.