<
संत गाडगेबाबा यांचे कृतीविचार आचरणात आणावे सत्यशोधक कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर अनेक लेखकांनी लिहिले आहे. त्या सगळ्यात प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून गाडगेबाबा हयात असतांना त्यांचे चरित्र बाबांच्या अनुयायांनी लिहून घेतले होते. त्याच्या 17 मार्च 1952 च्या मनोगतात प्रबोधनकार केशव ठाकरे लिहितात, साधू संत -महंतांची चरित्रे आजकालच्या पिढीला टाकाऊ वाटतात… पैकी अनेकांनी देवदेवता, धर्म, व्रते, दाने, तीर्थयात्रा यांचेच प्रचंड बंड माजवून लोकांना देवखुळे नि धर्मवेडे बनवले. दगडमाती धातूच्या मूर्तीच्या भजन पूजनाचे लोकांना वेड लावून त्यांना मानसातून उठवले,माणुसकीला पारखे केले.माणसापेक्षा दगड धोंडेच भाग्यवान ठरले. माणुसकीची अवहेलना आणि बदनामी करणाऱ्या या परिस्थितीला जोरदार कलाटणी, त्यांच्या आचार विचारात आरपार क्रांती घडवण्याचे महान कार्य क्रांतिकारक संत गाडगेबाबा करत आहेत.
त्यांच्या मृत्युपत्रात ,” या संस्थेत गाडगेबाबा त्यांचे वारस वंशीय नातेगोतेवाले यांचा सुतळीच्या तोड्यावरही कसला काही हक्क नाही.कोणी तसा कधी सांगू लागल्यास त्याला हुसकावून द्यावे.सदावर्तातही त्यांना अन्न घेण्याचा अथवा वसती करण्याचा हक्क नाही.”
१)जन्म आणि बालपण:-
विदर्भातील शेणगाव तालुका दर्यापूर जि अमरावती येथे झिंगराजी राणोजी जानोरकर आणि सखुबाई यांच्या घरात 23 फेब्रुवारी १८७६ गाडगेबाबा म्हणजेच डेबुजी यांचा जन्म झाला.परीट जातीत असून घरची परिस्थिती अगोदर उत्तम होती.परंतु गावात रोगराई, आनंद, सण उत्सव,बाळंतपण असं काही झालं की आसरा, बहिरोबा,खंडोबा, मसुबा, सटवाई, मरीमाय, गावदैवत यांच्या नावे “निवद ” बकरे-कोंबड्या यांची (मांस) बळी देवून “तीर्थ ” दारू पिऊन ते साजरे करण्याची रीत बनली होती. यात झिंगराजी फसला होता.नवसात आणि दारूच्या व्यसनात तो गुंतला होता, खंगला होता. त्यामुळे शेती, गुरे सावकाराकडे गहाण पडली होती.गावात ‘प्रतिष्ठा’ गेल्याने सहारा आणि उदरनिर्वाह करण्यासाठी ते शेजारच्या गावी मावसभावाकडे कोतेगाव ला आले. तिथे सखुबाई मोलमजुरी करून दिवस काढत होते. खंगलेला झिंगराजी मृत्यूच्या दारात असताना बोलला “सखू , खंडोबा, बहिरोबा, मातामाय ही दैवते यांना घरात ठेवू नको,यांच्या नादी डेबूला लागू देवू नको, यांना नवस केले नसते, बळी दिले नसते, तर मी दारुडा झालो नसतो! “काही दिवसांत त्याने प्राण सोडला. त्यामुळे पोरक्या , बेसहारा झालेल्या सखुबाई आणि सात वर्षाच्या डेबूला हे “बोल” मनी रुजले. मामा चंद्रभान यांनी त्यांना दापुरे या आपल्या गावी घेवून आले. दिवसभर शेतीकाम आणि गुरे- वासरे सांभाळणे यात माय लेक व्यस्त झाले. खूप प्रयत्न केल्यावर डेबूचा कुंताबाई धनाजी खिल्लारकर कमालपूर यांच्या सोबत 1892 ला विवाह झाला. मामा मोठा खर्चिक माणूस होता. दोन मुली , एक मुलगा यांच्या लग्नात भरमसाठ खर्च केला. त्यातच 1896 ते 99च्या दुष्काळात उत्पन्न झिरो झाले.त्यामुळे सावंगी दुर्गड च्या तिडके सावकाराकडून कर्ज घेतले. जुने घर पडले म्हणून नवे विटांचे घर बांधण्यासाठी पुन्हा कर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड झाली नाही, मामांनी हाय खाल्ली अन मामाही गेला! डेबूने खूप मेहनत करून शेती ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. कर्ज फेडत गेला. सावकाराच्या आर्थिक हिशोबातील घोळ बाहेर काढला, त्याच्यासोबत वाद झाले, त्यावेळी त्याला नीट केले, तरीही 56 एकरपैकी 15 एकर बळीरामच्या जमीन ताब्यात राहिली.बाकी सावकाराने हडप केली.
२)परंपरा नाकारली ,त्याग :-
डेबूजीला अलोका, कलावती आणि मुदगल हा मुलगा आणि आणखी बायकोला दोन महिने झाले होतेच. त्याने मुलीच्या बारसे कार्यक्रमात बोकडे दारू ऐवजी फक्त गोड जेवण यावर ठाम राहिले. सोयरे यांनी विरोध करूनही ते ठाम राहिले. त्यानंतर ते लोकांना हे थोतांड सांगण्याचा प्रयत्न करत होते. दिवस दिवस विचार करत होते आणि चिंतन करत होते. आणि बहुजन समाजाच्या घर, संसार सुखी करण्यासाठी,त्यांना अज्ञान, मनूची विषमतावादी धर्मव्यववस्था, दुष्ट रूढी परंपरा, चालीरिती, उत्सव , अंधश्रद्धा यातून बाहेर काढण्यासाठीचे जिवित्ताचे उद्दीष्ट ठरविले. त्यासाठी पुन्हा एकदा तथागत, संत कबीर, संत रविदास,संत नामदेव, संत तुकाराम महाराज यांच्या प्रमाणे मार्ग अनुसरला.! ती तारीख होती 1 फेब्रुवारी 1905.
3) चरथ चारिका:-
डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्या कानात फुटक्या बांगडीची काच,एका हातात खराटा, अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव दिवसा झाडून स्वच्छ करीत. आणि रात्री कीर्तनात माणसांच्या डोक्यातील घाण विचार, दुष्ट रूढी यावर ते प्रश्न उत्तराने Curatingसंपूर्ण स्वच्छ करत!स त्य कीर्तनात ते चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. आपले विचार समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा उपयोग करत असत.इतर आजच्या किर्तनकाराप्रमाणे ते मोह, माया, ब्रम्ह, स्वर्ग, नरक, मृत्यू, मोक्ष या विषयी न बोलता रोजच्या जीवनाबद्दल बोलत.तुमचा देव असा कसा जो पुजारी, देवऋषया मार्फत कोंबडे,बकरे खायला मागतो?’ तो मूलबाळ नीट करण्यासाठी तो साहेबाच्या घरचा लाचखाऊ शिपाई आहे काय? नाहीतर ती बकरे कोंबडे तुम्ही तशीच सोडून द्या की! तसं नाही करत.
एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना…समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, ” बिचार्या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ? त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा “देव ” दगड असतो म्हणून ? संत गाडगेबाबा सतत भ्रमण करीत राहिले. अनेक ठिकाणच्या दुष्ट परंपरा, प्रथा त्यांनी बंद केल्या. कीर्तनात बाबा प्रश्न विचारत तुमचा देव एक की दोन किंवा अधिक आहेत? जर एक तर गावात चार चार मंदिरे कशी तसेच शेतात म्हसोबा, विहिरीवर आसरा कशा काय? बाबा हळूहळू पुढे प्रश्न विचारीत, संध्याकाळी देवळात दिवा कोण लावते देव की पुजारी? तुमच्या देवाला अंग धुता येते काय?.. नाही. ज्याले अंग धुवायची अक्कल नाही, त्याला देव म्हणता? तुमच्या देवाला धोतर नेसता येते का? नाही. ज्याला धोतरही नेसता येत नाही त्याला देव म्हणता? तुमच्या देवापुढं निवद ठेवला -कुत्रं भिडल, तर कुत्रं हानता येते का? नाही. कुत्रं हानायची ज्याच्या अंगात ताकत नाही, त्याला देव म्हणता? बरं तुमच्या देवाला देवळापूरता तरी ,आत उजेड पडते का? नाही . इझला दिवा,मंडळी आली, बापूराव दिवा लावा.मंडळी दर्शनाला आली आना दिवा.देव कोणी दाखविला! दिव्यानं! दिवा मोठा की देव मोठा? दिवा! देवळात देव नाही..!बाबा यासाठी अभंगाचे प्रमाण देत.जत्रा मे फत्रा बिठाया तिरथ बनाया पाणी।दुनिया भई दिवानी पैसे की धुलधानी।तीर्थाला जान देवाचा संबध नाही.पैशाचा नाश खाना खराब आहे.गणपती बसविणे ही देवाची भक्ती नाही! ही रूढी पडली आहे.बँड, सिंहासन पूजा निवद मोदक,आरत्या शेवटच्या रोजी उठवता का नाही? डोक्यावर घेऊन मग ‘कुकडे ‘लांबोता’? खोल पाण्यात मोरया चले जावं! शोभा केली,आरत्या केल्या,त्याला पाण्यात बुडवून मारता? ही देवाची भक्ती नाही. त्यामुळे हे सर्व करूच नका. कीर्तन संपल्यावर लोक पाया पडायला येत त्यावेळी ते पाया न पडता हातात झाडू घेवून गावसफाई करा असा सल्ला देत. लोकही आनंदाने तसं वागत. तीर्थक्षेत्र लोकं येणं थांबत नाही हे समजल्यावर बाबांनी तिथे जावून स्वच्छता मोहीम हाती घेतली. मग बाबा सत्यनारायण पोथी पूजेवर बोलत! 8 नोव्हेंबर 1956 ला वांद्रे , मुंबई पोलीस स्टेशन यांनी संत गाडगेबाबा यांना बोलविले होते. दुपारी मात्र त्यांनी सत्यनारायण पूजा केली होती संध्याकाळी बाबांचे कीर्तन झाले. कीर्तन सुरू झाले. प्रश्न उत्तरे चालू – सत्यनारायण लोभी लोक करते. मुलगा नाही, गाडी नाही, पैसे मिळत नाही, जागा मिळू दे कर सत्यनारायण. साधुवान्यानं प्रसाद नाही घेतला, सत्यनारायण नाही केला, त्याची करोडो रुपयांची नौका पाण्यात बुडाली! … अडीच रुपयांचा सत्यनारायण केला प्रसाद वाटला, घेतला अन करोडो रुपयांची नौका वर आली, ते वर आली! नाही नाही हे खरं नाही. ज्या साली लढाई झाली,त्या साली समुद्रात एकेक आगबोट पन्नास कोट रुपयांची पार तळाला गेली.पत्ता नाही. अशा कितीतरी आगबोटी बुडाल्या.सत्यनारायण करणाऱ्या भटजीला म्हणावं अडीच रुपये घेवून कशाला एवढी बडबड करता-अडीच लाख -अडीच कोट रुपये घ्या-समुद्राच्या किनाऱ्यावर एक सत्यनारायण करा अन एक आगबोट आना वर. जमेल का? नाही. नाही.देवळात देव नाही. देऊळ तयार झालं . मुर्ती आणावी लागते का नाही? मग मूर्ती ईकत का फुकट? देव ईकत भेटत असते? मेथीची भाजी हाय, कांदे बटाटे हाय? देव इकत भेटते का? ही समजच ज्या माणसाला नाही तो माणूसच कसा? संपूर्ण महाराष्ट्रभर बाबांची अनेक गावात स्वच्छता आणि कीर्तन झाली आहेत. बाबांचे कीर्तन म्हटले की दूर दुरून लोकंयेत.पंढरपूर येथे गाडगेबाबा यांना बडवे त्रास देत. अस्पृश्य वारकऱ्यांनाही त्रास देत. बाबांनी त्या सर्वांसाठी पहिली धर्मशाळा बांधली, जिला चोखोबा धर्मशाळा म्हणतात. पुढे आणखी दोन धर्मशाळा बांधल्या. त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
4) शिक्षणाने मनुष्यत्व ,पशुत्व हटते :-
शिक्षणाचे महत्त्व बाबांनी अनुभवले होते. निरक्षरतेमुळे मामाचे शेत सावकाराच्या घशात गेले होते.यासोबतच एक अनुभव जो पत्र वाचून देण्यासाठी एक व्यक्तीला बरीच लाकूड फोडून द्यावे लागतात, थकल्यावर गाडगेबाबा फोडू लागतात, परंतु तरीही तो मालक पत्र वाचवून दाखवत नाही! शेवटी न वाचता परत करतो. या घटनेचा बाबांवर खूप परिणाम झाला. एकवेळ उपाशी रहा, चार कपडे कमी घाला,चार सणाला गोडधोड कमी करा, पण मुलांना शाळा शिकविल्याशिवाय राहू नका.त्यामुळे बाबांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्था, डॉ पंजाबराव देशमुख यांच्या श्रीशिवाजी शिक्षण संस्था, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला आर्थिक भौतिक मदत करत होते. त्यांच्या सहकार्याने सूचनेनुसार अनेक शाळा वसतिगृह उभी राहिली. भटक्या आणि मागास जमातीच्यामुलांमुलीसाठी गाडगेबाबा मिशनच्या आज 52 शाळा व वसतिगृहे आहेत.मुंबईच्या भायखळा मार्केटमधील कीर्तन ऐकण्यासाठी स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर बसले होते.दोघांचे संबंध अगदी जिवाहळ्याचे होते.
बाबासाहेबांच्या महिलासह, बहुजनांच्या मुक्तीलढ्याला गाडगेबाबा यांचा पाठिंबा होता,आपल्या कीर्तनात ते याबाबत प्रबोधन करत. महात्मा गांधीच्या सोबत त्यांची दोनदा भेट झाली होती. पण ते त्यांच्या सोबत रमले नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगेबाबांना वडिलासमान मानत. त्यांचेच कृतीविचार ते प्रचार आणि प्रसार करत होते. पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे’ अथणीला’ झालेले भाषण बाबांना ठाऊक होते. -ज्यात (“तेली तांबोळी, कुणबटाना देशाच्या संसदेत जावून काय नांगर हाकायचा आहे काय?” ) स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले “टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? टिळक महाराज काय बी करा पण आम्हालाबी ब्राह्मण करा.
5)”समाजाची संपत्ती समाजासाठीच वापर:-
बाबांनी बांधलेल्या धर्मशाळा, वसतिगृहे, गोरक्षणे ही संस्थेच्या मालकीची होती. त्यांच्या मालकी हक्कात नातेवाईक किंव कुटुंबीय यांचा संबंध नव्हता. एकदा मुलगी अलोका आणि पत्नी कुंताबाई यांना थंडीपासून संरक्षणासाठी दोन चादरी दिल्या , त्या हिशोबात न आल्याने त्यांनी व्यवस्थापक यांना सांगून सर्व कुटुंबीय यांना धर्मशाळा पाहुणचारबंदी केली होती. तर खारेपाटण जिल्हा रत्नागिरी येथे 5 मे 1923 ला कीर्तनात निरोप आला की बाबा आपला एकुलता एक मुलगा गोविंदा वारला, बाबा क्षणभर थांबले आणि कीर्तन पुढे सुरूच ठेवले. राम गेले, कृष्ण गेले, पांडवही गेले. ऐसें गेले कोट्यानुकोटी । काय रडू मी एकासाठी। दुसऱ्या दिवशी ठरल्यायाप्रमाने पुढील गावी ते गेले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर 1956 ला निधनाच्या बातमी नंतर बाबा खूप रडले, त्यांना अतीव दुःख झाले. ते आजारी पडले होतेच आणि त्यानंतर अवघ्या 13 दिवसांनी म्हणजे 20 डिसेंबर 1956 ला बाबांनी अमरावती जवळ वलगावच्या पेढी नदीच्या पुलावर प्राण त्याग केला.
अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे. तरीही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की, संत गाडगेबाबा यांचे क्रांतिकारक कृतीविचारांना पुढे अनुयायी बनून पुढे नेवूया. कारण अनुयायी गाफील जर राहिले तर विचारांत भेसळ होते, जसे एका महाराजांनी गाडगेबाबा चमत्कारी पुरुष होते, त्यांना दैवी शक्ती प्राप्त होती. गाडगेबाबा यांच्या जयंतीला, स्मृतिदिन वेळी सत्यनारायण घालू नये म्हणजे झालं!! थांबतो धन्यवाद.
लेखक:-रामेश्वर त्रिमुखे, जालना. Mo.9420705653 , विभागीय अध्यक्ष, सत्यशोधक वारकरी महासंघ, औरंगाबाद विभाग.
खूप छान लेख लिहिला आहे आपण. आपले आभार आणि शुभेच्छा.