<
तलाव परिसराची केली पाहणी : मक्तेदाराला दिल्या सूचना
जळगाव, दि.२३ – अमृत योजनेंतर्गत शहरातील मेहरूण तलाव परिसराचा हरित क्षेत्र विकासात समावेश करण्यात आला आहे. त्याठिकाणी ६ हजार रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी मक्तेदाराला देण्यात आली आहे. रविवारी सकाळी महापौर भारती कैलास सोनवणे यांनी त्याठिकाणी जावून कामाची पाहणी केली व मक्तेदाराला सूचना केल्या.
पाहणीप्रसंगी स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेवक नितीन लढ्ढा, शहर अभियंता सुनील भोळे, नेमाडे आदी उपस्थित होते. हरित क्षेत्र विकास कार्यक्रमात मेहरूण तलाव परिसरात ६ हजार वृक्ष लागवड करण्यात आली असून त्यांचे संगोपन केले जाणार आहे. मक्तेदाराकडून त्याठिकाणी सुरू असलेल्या सर्व कामाची आणि सद्यस्थिती महापौर भारती सोनवणे यांनी जाणून घेतली. तसेच वृक्ष संगोपन योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
नागरिकांनी वृक्षांची काळजी घेण्याचे आवाहन
मेहरूण तलाव परिसराचा दिवसेंदिवस विकास होत आहे. तलावाच्या काठी फिरायला येणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. तलावाच्या काठी फिरायला येणारे काही जण झाडांना लावलेल्या सुरक्षा जाळ्या तोडून टाकतात, बऱ्याच वेळा तर कोवळे झाड देखील तोडण्यात येते. तलाव परिसरात फिरतांना आपल्यामुळे कोणत्याही वृक्षांची हानी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.
अंबरझरा ते मेहरूण पाटचारीच्या पुनर्भरणासाठी प्रयत्नशील
मेहरूण तलावात पाणी येण्याचा प्रमुख स्रोत अंबरझरा तलाव आहे. तलाव भरल्यानंतर त्याच्या पाटचारीतून मेहरूण तलावात येत असते. परंतु ती चारी कच्ची असल्याने दरवर्षी फुटते किंवा कचऱ्याने भरते त्यामुळे सर्व पाणी इतरत्र वाहून जाते. मेहरूण तलाव कायम भरण्यासाठी अंबरझरा ते मेहरूण पाटचारीचे पुनर्भरण आवश्यक असल्याचे निवेदन मराठी प्रतिष्ठानतर्फे महापौर भारती सोनवणे यांना देण्यात आले. यावेळी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड.जमील देशपांडे, विजय वाणी, आर्किटेक्चर शिरीष बर्वे, विद्याधर नेमाने आदी उपस्थित होते. दरम्यान, अंबरझरा पाटचारीचे अंदाजपत्रक लघुपाटबंधारे विभागाने तयार केले आहे. मनपाकडून यासंदर्भात लवकरच प्रस्ताव तयार करून तो डीपीडिसीच्या बैठकीत सादर करण्यात येईल आणि निधीची मागणी करून लवकरात लवकर पुनर्भरण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन महापौर भारती सोनवणे यांनी दिले आहे.