<
रसिकांना स्वर्गीय अनुभव देणारा अनोखा परिवर्तनचा कार्यक्रम;बासरीच्या स्वरातून भाऊंना भावांजली
जळगाव-(प्रतिनिधी) – परिवर्तन आयोजित भवरलाल जैन यांना भावांजली महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी बासरी वादक योगेश पाटील व त्यांच्या ४५ कलावंतांनी आपल्या कलेतून बासरी वादनातून स्वरांची उधळण केली. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने कलाकारांनी लावलेल्या बासरीच्या स्वरांनी अवघा उद्यानाचा परिसर बहरून आला. राग भुपालीपासून सुरू झालेल्या मैफिलीत राग दुर्गा, राग वृंदावनी सारंग, राग यमन व विविध गीते – रघुपती राघव राजा राम, गोपाला गोपाला, ओम जय जगदीश , टिक टिक वाजते, प्यार का नगमा, लकडी की काठी , फ्युजन , ओठो से छूलो तुम , पल पल दिल के पास , मेरे रश्के कमर, पहाडी गीत छुकर मेरे मन को , पंख होते तो उड आती रे रीम झिम गिरे सावन, सैराट या सारखी काही सिने गीतही बासरीच्या साहाय्याने वाजवून रसिकांची दाद मिळवली.
तबल्यावर साथ श्री. योगेश संदानशिव (अंमळनेर) यांनी दिली. या कार्यक्रमाला उद्योगपती अशोक जैन, अनिल शहा, डॉ रेखा महाजन, प्रेम कोगटा, डॉ सुभाष चौधरी, श. दि. वडोदकर हे प्रमुख पाहुणे होते. तर महोत्सव प्रमुख अमर कुकरेजा, अनील कांकरिया, अनिस शहा नारायण बाविस्कर , सुदिप्ता सरकार, किशोर पवार यांनी स्वागत व सन्मान केले. प्रास्ताविक महोत्सव प्रमुख अमर कुकरेजा यांनी केले. त्यात या वेणुत्सवाविषयी सांगतांना त्या़नी भवरलाल भाऊंच्या आठवणी सांगत त्यांचे बासरीवरील प्रेम व त्याविषयीच्या आठवणी मांडल्या. नऊ दिवसीय या महोत्सवाचा तिसरा दिवस गर्दीने उच्चांक गाठला होता. अनेक प्रेक्षकांना जागे अभावी निराश होऊन जावे लागले.
सात ते ४५ वर्षे वयातील कलावंतांनी अप्रतिम असे बासरीवादन करत यमन कल्याण सारखे राग वाजवत उपस्थितांची मने जिंकली.अभिनव अशा ४५ बासरी वादकांच्या वादनाचे अनोखे सादरीकरण परिवर्तनने घडवून आणल्याबद्दल मान्यवरांनी कौतुक केले. या कार्यक्रमातील सर्व कलावंत हे स्थानिक कलावंत होते, त्यांनी मेहनतीने कला आत्मसात केलीय, भावांजली महोत्सवाच्या निमित्ताने जळगावात पहिल्यांदाच असा अनोखा प्रयोग सादर करण्यात आला आहे. हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.