Tuesday, July 22, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे उद्गाते – भवरलालजी जैन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/02/2020
in राष्ट्रीय, लेख
Reading Time: 2 mins read
आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे उद्गाते – भवरलालजी जैन

जैन इरिगेशन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा आज 25 फेब्रुवारी रोजीला श्रद्धावंदन दिन आहे. शेती, शेतकरी आणि पाणी विषयात केलेल्या कार्यकर्तृत्वाची गाथा या निमित्ताने अधोरेखित करण्याची संधी घेत आहे. आजीवन कृषि व कृषितंत्रज्ञानाचा पुरस्कार करणारे भवरलालजी जैन आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे उद्गातेच होते. यांच्याबाबत थोडक्यात…

‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, करी विचार !!’ सर्व व्यवसायांमध्ये शेतीचा व्यवसाय उत्तम. त्यापेक्षा व्यापार हा कमी दर्जाचा व नोकरी हा कनिष्ठ व्यवसाय आहे. पूर्वीचे हे वचन आजच्या परिस्थितीचा विचार करता किती योग्य, किती समर्पक आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. डॉ. भवरलालजी जैन तथा मोठेभाऊ यांचा जन्म शेतक-यांच्या कुटुंबात अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेल्या वाकोद येथे झाला. वाकोदसारख्या खेड्यातून आलेल्या भाऊंनी घरातील प्रतिकूल परिस्थितीतही उच्च शिक्षण घेतले. एमपीएससीची राजपत्रित परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. त्यावेळी त्यांना जिल्हाधिकारीही होता आले असते. शेतीच्या तुलनेत आरामदायी जीवन व्यतीत करता आले असते. एल. एल. बी. पदवी होतीच. कायद्याच्या क्षेत्रातही कर्तबगारी सिद्ध करण्याची गुणवत्ता त्यांच्यात होतीच. मोठ्याभाऊंना मात्र शेतीच खुणावत होती.

“Agriculture – A Profession with Future” हे वाक्य त्यांनी त्यांच्या पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या स्कॉटिश मिशनच्या ड्रीलिंग रिगवर लिहिलेले वाचले. भाऊंजवळ एवढे सगळे पर्याय उपलब्ध होते. भाऊंनी आई गौराबाईंना विचारले की ‘मी आता कोणता व्यवसाय करु?’ तेव्हा आईने त्यांना ‘तू केवळ तुझे आणि आपल्या कुटुंबाचेच पोट भरेल एवढेच काम न करता अजून काही परिवारांचे पोट भरेल आणि त्या कामात केवळ माणसेच नव्हे तर मूक प्राणी-पक्ष्यांचेदेखील भले करु शकशील असा व्यवसाय कर. ‘मातोश्रींच्या मार्गदर्शनानुसार उत्तम असा व्यवसाय शेती हाच होता आणि भाऊंवर ड्रीलिंग रिगवर वाचलेल्या वाक्याचा प्रभाव होता. भाऊंनी कृषिक्षेत्रातच कठोर परिश्रम वेचण्याचे निश्चित केले. ‘शेतीची उत्पादकता आपण पूर्णपणे विकसित करु शकलो तर जगाच्या अन्नधान्याची गरज निम्म्याने पूर्ण करू शकू’ हाच त्यांचा मुख्य विचार होता आणि कृतिशील ध्यासही.

भाऊंनी बरड माळरानावर नंदनवन उभे केले. मोठ्याभाऊंनी पाणलोट क्षेत्रातून विशिष्ट तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पावसाचे पाणी अडवले व जिरवले. त्यामुळे सिंचन कार्यक्षमता मिळते. भाऊंनी स्वतः केलेले काम पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, जलसंधारण आणि जलरक्षण हे अधोरेखित करण्यासारखे आहे.

जैन हिल्स परिसरात शेती करायला सुरुवात केली. त्याच कालावधीत जळगावातच भाऊंनी ‘जैन ब्रदर्स’ या नावाने व्यावसायिक प्रतिष्ठान सुरु केले होते. त्यांनी १९६३ साली घरातील काही पिढ्यांची बचत असलेली रक्कम ७००० रुपये व्यवसायासाठी भांडवल म्हणून शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी आई गौराबाईंकडून घेतली. सुरुवातीच्या काळात त्यांनी रॉकेलची एजन्सी घेतली व विक्री केली. अशातच त्यांनी पेट्रोल पंपाचा व्यवसायही स्वीकारला. त्यांनी शेतीसाठी उपयोगीखते,अवजारे,जंतुनाशके, बिबियाणे यांची एजन्सी घेतली. विश्वासाने व सचोटीने व्यवहार केल्याने भाऊंचे शेतक-यांशी सलोख्याचे संबंध निर्माण झाले. तसेच शेतक-यांना उपयोगात येणा-या ट्रॅक्टर व मोटरसायकलचीही एजन्सी घेतली व याही व्यवसायात पंचक्रोशीत नावलौकिक प्राप्त केला.

केळीची पावडर बनवण्याचा बंद कारखाना भाऊंनी १९७८ साली विकत घेतला. त्यांनी तिथेच पपईच्या पांढ-या चिकापासून पपेन तयार करण्याचा पक्का विचार केला. शेतक-यांकडून पपई विकत घेऊन त्यापासून जर हे पपेन शुद्ध केले तर त्याला विदेशात भरपूर मागणी आहे हे त्यांच्यातील चतुरस्त्र व्यावसायिकाने ओळखलं होतं. सुरुवातीला अमेरिकेतल्या काही कंपन्यांनी पपेन शुद्ध नसल्यामुळे कमी भावात खरेदी केले. भाऊंनी जळगावमध्येच एक प्रयोगशाळा उभारुन पपेनची शुद्धता वाढवली व असे दर्जेदार उत्पादन योग्य नफ्याने विदेशात निर्यात करण्यात यश मिळविले. जळगावच्या शेतक-यांना भाऊंनी पपई लागवडीसाठी उत्तेजन दिले. भारताला परकीय चलन त्याकाळात या निर्यातीतूनसुद्धा मिळाले.

पीव्हीसी पाईपची एजन्सीही कृषीकार्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली. शेतक-यांना पीव्हीसी पाईपचेयोग्य उपयोजन समजावून दिले कारण, पीव्हीसी पाईपमुळे बऱ्याच दूरवरच्या अंतरावरुनदेखील पाणी सहजपणे नेता येते व लोखंड आणि सिमेंटच्या पाईपात जशी पाण्याची गळती होऊ शकते तसे या पाईपांमुळे पाणी गळत नसल्याचे शेतक-यांच्याही लक्षात आले. पर्यायाने पीव्हीसी पाईपांची मागणी खूप वाढली. पुरवठ्यापेक्षा पीव्हीसी पाईपची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. साहजिकच भवरलालजींनी पीव्हीसीपाईपांची निर्मिती व मोठ्या प्रमाणावर उत्पादन स्वतःच्या कंपनीत घेण्याचे निश्चित केले. जळगावातील पहिला पीव्हीसी पाईप निर्मिती करणारा कारखाना निमखेडीला त्यांनी १९८० साली कार्यान्वित केला. कंपनीच्या विस्तारासाठी बांभोरी येथे नवीन कारखाना उभारण्यासाठी जमीन विकत घेतली व तिथे नवीन कारखाना सुरु केला. जैनच्या पीव्हीसी पाईपांची आणि प्रत्येक उत्पादनाची गुणवत्ता सर्वोत्तम राहील याकडे भाऊंनी अत्यंत दक्षतापूर्वक लक्ष दिले.

अमेरिकेतील फ्रेस्नो येथे एका प्रदर्शनाला गेल्यानंतर ठिबक सिंचनाचा संच भाऊंनी तिथे बघितला आणि ठिबक सिंचन हे जलबचतीचे आणि पिकाला योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने पाणी देणारे तंत्रज्ञान असल्यामुळे भाऊ प्रभावित झाले. हे नवतंत्रज्ञान शेतक-यांसाठी अतिशय लाभदायक ठरेल हे त्यांनी दूरदृष्टीनेओळखले. भारतातच भाऊंनी ठिबक सिंचनाचे संच निर्माण करायचे ठरविले. त्याकरता अधिक भांडवल गोळा करण्यात आले. भूमिपुत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड’ या कंपनीची स्थापना भाऊंनी केली. १९८८ साली कंपनीने ठिबक सिंचन संचाच्या निर्मितीला प्रारंभ केला.

श्रध्देय मोठेभाऊ स्वतः एक जागरुक अभ्यासक, संशोधक उद्योजक होते. भाऊंनी पुढे केळी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘ग्रँड नैन’ या वाणाची उतीसंवर्धक रोपे, तयार करण्यासाठी जैन हिल्सला एक सुसज्ज प्रयोगशाळेची व निर्मिती केंद्राची उभारणी केली. १९९४ साली शेतकऱ्यांना ही रोपे उपलब्ध करुन दिली. याद्वारे जळगावात केळीची शेती ही मोठ्या प्रमाणात वाढली व फोफावली. यासंबंधी कंपनीच्या सहका-यांनी उतीसंवर्धक रोपांचे फायदे स्थानिक शेतकऱ्यांना पटवून सांगितले. जैन इरिगेशन आता शेतकऱ्यांना केळी, डाळिंब यांच्या उती संवर्धित रोपांचा (टिश्यूकल्चर) पुरवठा करते. जैन इरिगेशनने महाराष्ट्र राज्य सरकार बरोबर करार करुन गिरणा नदीवर कांताई बंधारा उभारला. त्यासाठी कंपनीने टाकरखेडा येथेही उतीसंवर्धन (टिश्यूकल्चर) पार्क उभारलेला आहे. टिश्यूकल्चर तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली. साहजिकच त्यांचे उत्पन्नही चांगलेच वाढले.

भारतातील ठिबक सिंचनाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कंपनीने विस्तार विभाग सुरू केला. भवरलालजी तथा मोठोभाऊ हे भारतातील ठिबक सिंचनाचे आद्य प्रणेते ठरले. भवरलालजींनी शेती, शेतकरी आणि पाणी या विषयात खूप अभ्यास केला. कृतिशील प्रयोग केले. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हाच त्यांचा हेतू होता. त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची अगदी जवळून ओळख होती कारण ते स्वत: शेती करत होते. त्यांनी शेतकऱ्यांना जास्त व चांगल्या गुणवत्तेचे पीक कसे घ्यावे हे प्रत्यक्ष जैन हिल्स जळगाव येथे डेमो फार्म करुन दाखवून दिले. तंत्रज्ञानात सुधारणा करुन जैन इरिगेशनने पॉलीइथीलिन म्हणजेच पीई पाईपचे 1994 मध्ये भारतात सर्वात प्रथम उत्पादन केले व त्याचा दर्जादेखील सर्वोत्तम ठेवला. जैन हिल्सला शेती संशोधन केंद्र भाऊंनी स्थापन केले. जैन हिल्सला म्हणूनच भारताचे माजी कृषीमंत्री, पद्मविभूषण श्री. शरद पवार साहेब यांनी ‘कृषी पंढरी’ असे संबोधले आहे.

भवरलालजींनी पांढऱ्या कांद्याचे निर्जलीकरण करुन त्याची पावडर व तुकडे निर्यात करण्यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग 1994 मध्ये स्थापन केला. त्यासाठी अत्याधुनिक कारखाना जैन व्हॅली परिसरात उभारला. शेतकऱ्यांना कांद्याचा हमी भाव दिला. त्यासाठी जैन इरिगेशनने शेतकऱ्यांना कांद्याचे सुधारित बियाणे दिले व पिकाच्या देखरेखीसाठी योग्य असे तांत्रिक मार्गदर्शनही केले. कंपनीत बायोगॅस प्रकल्प जैन हिल्समध्ये 2005 मध्ये उभारण्यात आला. या गॅसचा उपयोग कंपनीच्या सार्वजनिक भोजनगृहात राजाभोजमध्ये स्वयंपाकासाठी होतो. त्यामुळे एलपीजी गॅसची बचत होते.

सौर ऊर्जेचे महत्त्वही भवरलालजींना होतेच. जैन व्हॅलीमध्ये सोलर हीटर, सौर दिवे या उपकरणांची निर्मिती करण्याचा कारखाना २००५ साली उभारला. सोलर पॅनलचा निर्मिती प्रकल्पही जैन व्हॅलीत २००८ला कार्यान्वित झाला. तसेच ८.५ क्षमतेचा सौर ऊर्जेवर वीज निर्माण करण्याचा प्रकल्प व १.५ मेगावॅट बायोगॅसपासून वीज तयार करण्याचा कारखाना सुरु झाला. कंपनीचा सौरपंप तयार करण्याचा कारखानाही भाऊंच्या देखरेखीत २०१० साली कार्यान्वित करण्यात आला. भवरलालजींची दूरदृष्टी यातून दिसते कारण अपारंपरिक व हरित ऊर्जा निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे कारखान्यांना लागणाऱ्या वीज बीलात लक्षणीय घट होते. कारण कोळसा, गॅस, डिझेल या सारखे मर्यादित साठे वापरुन तयार केलेली वीज ही आर्थिकदृष्ट्या कारखान्यांना महाग पडते. भाऊंनी जैन इरिगेशनच्या उत्पादनांची वाढती मागणी पाहून कारखान्यांची निर्मितीक्षमता मोठ्या प्रमाणात वाढवली.

कंपनीने जैन व्हॅलीत आंब्यावर प्रक्रिया करणारा जगातील सर्वात मोठा प्रकल्पही 1996 मध्ये कार्यान्वित केला. त्यामुळे कंपनी चांगल्या दर्जाचा मेगा पल्प, आंब्याचे अतिशीत तुकडे, इतर फळांचे पल्प जसे जांभुळ, पेरु आणि डाळींब तयार करते. कंपनीचा आयक्यूएफ प्रकल्प सुरु झाला आहे. कंपनी काही भाजीपाल्याचे निर्जलीकरण करते. यावर्षी कंपनीद्वारे विविध मसाले तयार करण्याचा कारखाना जैन व्हॅली परिसरातच जून-जुलै दरम्यान कार्यान्वित होईल. यात कंपनीद्वारे हळद, मिरची, आले, लसूण, काळी मिरी यांची पावडर (मसाला) तयार केली जाईल. ही उत्पादने विदेशातील व देशांतर्गत बाजारपेठेत विकली जातील. भाऊंनी ७ हजार रुपयांपासून सुरु केलेली कंपनी 8 हजार कोटींवर वार्षिक उलाढाल करणारी सिंचन क्षेत्रातील जगातील दुसऱ्या क्रमांकाची व भारतातील प्रथम अशा अग्रस्थानी आहे. जैन इरिगेशनचे जगभरात 33 कारखाने आहेत आणि त्यात सुमारे 12000च्यावर सहकारी काम करतात. कृषीक्षेत्रात स्वकर्तबगारीने लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान बदलविणाऱ्या भाऊंना श्रद्धावंदन दिनाला सादर प्रणाम!

अनिल बळवंत नाईक , जैन इरिगेशन सि. लि. जळगाव. मोबाईल नं. 9158686350

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

खेडी कडोली येथे निकम फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम – मोफत पोलीस भरती सराव मैदान उपलब्ध

Next Post

मू.जे.महाविद्यालयातील रसायनशास्त्र प्रशाळेतर्फे 26 रोजी चर्चासत्र

Next Post

मू.जे.महाविद्यालयातील रसायनशास्त्र प्रशाळेतर्फे 26 रोजी चर्चासत्र

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार मानधन, ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवा;नवीन विधेयक सादर

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications