<
जळगाव : आपल्या देशात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांचे अनेक प्रकार रोज घडत आहेत. त्यांचे शारीरिक, मानसिक शोषनांच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि या सर्वांना कुठेतरी थांबविणे अत्यंत महत्वाचे आहे. अशा विदारक परिस्थिती मध्ये युवतींना योग्य दिशा मिळावी, त्यांना शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना म्हणजेच एसडी सीड तर्फे युवती सशक्तीकरण शिबिरांचे आयोजन मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय जळगाव येथे नुकतेच करण्यात आले होते.
महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत युवतींसाठी आयोजिलेल्या या शिबिरात तज्ञ मार्गदर्शक श्री रत्नाकर महाजन, हिंगोली यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. शिबिराला मुख्याध्यापक श्री. गजानन सूर्यवंशी, एसडी-सीड असोसिएट प्रवीण सोनवणे, सौ. अर्चना धांडे, सौ. धनश्री फिरके, सौ. मीना नारखेडे हे उपस्थित होते. त्रसंचालन सौ. रुपाली वानखेडे यांनी केले तर आभार सौ. मोहिनी चौधरी यांनी मानले.
या शिबिरात महाजन यांनी आत्मजाणीव, संवाद आणि नाते संबंध, मासिक पाळी व स्वच्छता, आत्मसन्मान व स्व-संरक्षण, निवळ आणि निर्णय, मैत्री आणि मोह, प्रलोभने या विषयांवर मार्गदर्शन केले. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, आपल्यातील उणीवा, बलस्थाने यांची स्वतःला ओळख झाली की सुधारण्यासाठी कोठे वाव आहे आणि सुधारणाक्षम गोष्टींवर काम करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. त्यांनी सांगितले की, स्वत:ला वेगवेगळे प्रश्न विचारण्याची सवय लावून आत्मजाणीव वाढवू शकतो. नात्यांना तडा जाऊ न देता आपण इतरांच्या, आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करायला शिकले पाहिजे. त्यांनी दोन पिढ्यांमधील वाढता दुरावा, पालकांशी संवादाचा अभाव, मैत्रीचे चांगले-वाईट परिणाम, मुली-मुलांमधील शैक्षणिक विकासातील तफावत, वैवाहिक जीवनाबद्दल योग्य मार्गदर्शनाचा अभाव, आंतरजातीय विवाह, घटस्पोटाची वाढती संख्या, मोबाईल व इंटरनेट चा वाढता प्रभाव आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
एसडी-सीड मागील बारा वर्षांपासून आपल्या जळगाव जिल्ह्यातील गुणवंत, आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे. जिल्ह्यात बहुतांश जिद्दी व गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांना परिस्थितीमुळे त्यांना अनेक समस्या येतात. त्यांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे तसेच या पिढीने जागतिक पातळीवर आव्हानांशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम व्हावे हा व्यापक दृष्टीकोन समोर ठेवून वेगवेगळे उपक्रम एसडी-सीड मार्फत राबविले जात आहेत.
हे शिबीर यशस्वी होण्याकरिता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गजानन सूर्यवंशी आणि विद्यालयाचे व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी सीड गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.