<
जळगाव : शहरातील पाणी प्रश्न अत्यंत महत्वाचा झाला असून पाण्याच्या समस्येविषयी जनजागृती होणे महत्वाचे आहे. नीर फौंडेशनने याबाबत नुकताच एक व्यापक सर्व्हे केला आहे. शहरात आता पाणी पुरेसे आहे मात्र भविष्याकरिता पाणी साठवण्याची गरज असल्याचे तसेच पाण्याचे योग्य व्यवस्थापन होणे महत्वाचे असल्याचे सर्व्हेत दिसून आले आहे.
नीर फौंडेशनच्या वतीने शहरात पाणी प्रश्नावर एक महत्वाचा सर्व्हे करण्यात आला आहे. सुमारे १ हजार २०० नागरिकांच्या या व्यापक सर्व्हेक्षणात विविध प्रश्नाद्वारे नागरिकांनी पाणी प्रश्नावर मते व्यक्त केली आहेत. शहरात पाण्याचा सर्वाधिक वापर घरगुती करिता ५० टक्के तर औद्योगिक, व्यवसायाकरिता ४५ टक्के केला जातो. घरगुती वापरासाठी ५० टक्के नागरिक महापालिकेच्या नळ कनेक्शनचे तर ३५ टक्के नागरिक बोअरवेल आणि मनपाचे असे दोन्ही पाणी वापरतात.
तसेच पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी सरकारी संस्था पुरेशी काम करीत नसल्याचे ७७ टक्के नागरिकांचे म्हणणे असून सध्याच्या गरजा भागविण्यासाठी जळगावात पुरेसे पाणी उपलब्ध असल्याचे ७६ टक्के नागरिकांनी सांगितले आहे. जळगावकर नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभावदेखील दिसत असून पाण्याच्या परिस्थितीविषयी जनजागृती झाली पाहिजे हि मागणी ९७ टक्के नागरिकांची तर जलसंवर्धनासाठी नवीन कायद्याची निर्मिती व अंमलबजावणी व्हावी अशी 96 टक्के नागरिकांची मागणी आहे.
नागरिकांनी विविध सूचना देखील नीर फौंडेशनच्या प्रतिनिधींकडे मांडल्या आहेत. झोपडपट्टी परिसरांमध्ये नळ्यांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते. गच्चीवरील पाणी वाहून न जाता त्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. मनपाच्या पाणीपुरवठ्याचे पाईपलाईन गळक्या आहेत, त्या दुरुस्त व्हाव्या. कॉलनी, सोसायटी यांनी रेन वाटर हार्वेस्टिंग केले पाहिजे. बोअरवेलचा वापर कमी झाला पाहिजे, पाणी पुनर्भरण महत्व नागरिकांना माहिती असायला हवे, अशा विविध सूचना सर्व्हेक्षणातून करण्यात आलेल्या आहेत. या सर्व्हेक्षणाच्या आधारे शहराच्या पाणी प्रश्नाच्या नियोजनाकरीता फाउंडेशन काम करीत आहे. सर्व्हेसाठी संस्थ्यापक अध्यक्ष सागर महाजन यांच्या नेतृत्वात प्रकल्प प्रमुख शुभम ठाकूर, सचिन खैरनार, भावेश रोहीमारे, निलेश जोशी, आशिष सोनार, प्रद्युमन बोरसे आदींनी सहभाग घेतला होता.