<
ज्ञानपीठ पुरस्कृत कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने तथा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील साहित्य अभिरूची असणाऱ्या शिक्षकांचे एक मंडळ स्थापन केले जाणार आहे .
संकल्पित मंडळातर्फे शालेय विदयार्थ्यांच्या भाषिक विकासासाठी शैक्षणिक उपक्रम राबविणे ; खानदेशच्या प्रमुख बोली भाषेतील वैभव व संस्कृतीचा परिचय तसेच पाठ्यक्रम पुस्तकात ज्या खानदेशातील साहित्यिकांचे लेख कविता समाविष्ट झाले आहेत अशा मान्यवर लेखक व कवींची शाळेत” विदयार्थ्यांशी प्रत्यक्ष भेट ” आणि मूल्याधारीत कथाकथन , कविता वाचन , नाटयछटा , एकपात्री प्रयोग आयोजित करणे . शिक्षकांच्या सर्जनशीलतेसाठी लेखन कार्यशाळा , कवी संमेलने यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करणे . वैचारिक जडणघडण करणाऱ्या शैक्षणिक दर्जेदार पुस्तकांची मासिक भिशी , दिवाळी अंक मर्यादित वाचक परिवार असे नाविन्यपूर्ण उपक्रमही टप्प्याटप्प्याने राबविले जातील . सदरहू मंडळ स्थापनेच्या विचार विनिमयासाठी गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२० रोजीी संध्याकाळी ठिक ६ वाजता महाबळ रोडवरील काव्य रत्नावली चौकात आयोजित बैठकीसाठी शिक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तरसोद जिल्हा परिषद शाळेचे उपशिक्षक विजय लुल्हे यांनी एका पत्रकान्वये केले आहे .
मंडळाच्या भावी कृतीकार्यक्रमाच्या नियोजन व कार्यवाहीस दिशा दिग्दर्शनासाठी जळगाव जिल्हा शिक्षक व प्रशिक्षण संस्थेचे (डायट ) अधिव्याख्याता शैलेश पाटील , शिक्षणतज्ञ तथा लेखक समिक्षक चंद्रकांत भंडारी , सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष कवी डॉ . मिलिंद बागुल , सुप्रसिद्ध ” पाडा ” कादंबरीकार डॉ . अशोक कौतिक कोळी , प्रथितयश अहिराणी कथा कथनकार कवी डॉ . वाल्मिक अहिरे यांचे अक्षय मार्गदर्शन लाभणार आहे .