<
जळगाव : मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठी साहित्याचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करीत स्पर्धा, नृत्य यामध्ये सहभाग घेतला.
सुरुवातीला इयत्ता चौथीचे विद्यार्थी उज्ज्वल देवरे, यशस्वी पाटील या विद्यार्थ्यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर मराठी भाषेची देवता “ज्ञानेश्वरी” चा पहिला अध्याय शिक्षिका हर्षा काळे यांनी मुलांना वाचून दाखविला. ज्ञानेश्वरीची आरती छाया केदार यांनी सादर केली.
प्रसंगी विविध मराठी साहित्याचे पूजन संस्थेचे सचिव मुकेश नाईक यांनी केले. विद्यार्थ्यांनी ‘मी मराठी’ या गीतावर बहारदार नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. विद्यालयात घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत तीन गटांनी सहभाग घेतला. मराठी भाषेविषयी जुजबी ज्ञान असणारे प्रश्न यावेळी विचारण्यात आले. विजेत्या गटाला प्रमाणपत्र, रोख बक्षीस देण्यात आले. यानंतर मुलांनी मराठी भाषेचा गौरव करणारी गीते सादर केली. भाग्यश्री मिस्त्री, श्रद्धा कोळी, जयश्री चव्हाण, चैताली माळी, रागिणी कासार, उत्कर्षा सपके, लीना माळी, उर्वशी सपके या विद्यार्थिनींनी भाषणे देखील दिली.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक उज्ज्वला ननवरे, साधना शिरसाठ, माधुरी सपकाळे, जया पाटील, किरण पाटिल, कविता बढे, गीता भावसार, आम्रपाली शिरसाठ, सरीता परदेशी, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.