<
जळगांव-(प्रतिनिधी)- मेहरूण परिसरातील राज प्राथमिक विद्यालयात आज मराठी राजभाषा दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात विद्यालयाचे उपशिक्षक ज्ञानचंद बऱ्हाटे यांनी ग्रंथ पूजनाने केली. तसेच उपशिक्षक केतन बऱ्हाटे यांनी मराठी राजभाषा दिनाबद्दल माहिती व मराठी भाषेचे आपल्या जीवनातील महत्व सांगितले. प्रसंगी आदिती राजपूत, दिशांत वाघ या विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यालयात सुंदर हस्ताक्षर व निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यात सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत सुशील सैंदाणे (१ली), समृद्धी ठाकूर(२री), यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच निबंध स्पर्धेत मुलांमध्ये प्रेम सूर्यवंशी(३री), दिशांत वाघ(४थी), मुलींमध्ये शीतल पाटील(३री), दिक्षा तायडे(४थी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तद्नंतर विद्यालयात मराठी पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मराठी पुस्तकांची ओळख करुन माहिती घेतली. विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आभार उपशिक्षक संदीप खंडारे यांनी मानले.