<
जळगाव : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नेहमी सकारात्मक विचारसरणी असावी. सातत्याने अपडेट राहत, जीवनात लोकांशी सतत संवाद साधत राहिल्याने संभाषण चातुर्य शिकता येते असे प्रतिपादन अमरावती येथील राष्ट्रीय प्रशिक्षक अनिल मुणोत यांनी केले.
येथील जेसीआय जळगाव संस्थेतर्फे प्रभावी संभाषण कौशल्य याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जळगाव जेसीआयचे अध्यक्ष शरद मोरे होते. यावेळी अनिल मुणोत यांचा जळगाव शाखेतर्फे सन्मान करण्यात आला. या वेळी बोलताना अनिल मुणोत म्हणाले की, उत्तम संवाद साधण्यासाठी छोट्या वाक्यांपासून सुरुवात करावी. स्वत:ला व्यक्त करण्यासाठी स्टेज डेअरिंग येणे महत्वाचे आहे. लहान कार्यक्रमांपासून मंचावर सादरीकरण करायला सुरुवात केली पाहिजे, असे सांगत मुणोत यांनी वेळेत कसे बोलावे, आत्मविश्वास कसा निर्माण करावा, सकारात्मक कसा ठेवावा याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी काही प्रात्यक्षिके देखील करून दाखविली.
आभार प्रमोद गेहलोत यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी अध्यक्ष आबासाहेब पाटील, वरुण जैन, प्रतिक शेठ, मोईन अहमद, संजीव पाटील, मयुरेश निंबाळकर, रोहित मोरे, वासुदेव महाजन, श्रद्धा मोरे आदींनी परिश्रम घेतले.