<
भारतीय संस्कृती व परंपरा जोपासण्यात मराठी भाषेचे महत्वपूर्ण योगदान–जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील
जळगाव, दिनांक 27 (जिमाका) : भारतीय संस्कृती व परंपरा जोपासण्यात मराठी भाषेचे महत्वपूर्ण योगदान आहे. मातृभाषा मराठीला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक माणून प्रत्येक मराठी माणसाने तीचा मान, सन्मान आणि तीची अस्मिता शेवटच्या श्वासापर्यंत जपावयास हवी. असे प्रतिपादन जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी केले.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक, कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून शासनातर्फे साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व. वा. वाचनालयाचे सचिव मिलींद कुलकर्णी, जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडीत, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, उप शिक्षणाधिकारी (माध्यमिक) गणेश शिवदे, नुतन महाविद्यालयाचे मराठी विषयाचे निवृत्त शिक्षक बी. आर. पाटील, ‘अशी शिका मराठी भाषा’ या पुस्तकाचे लेखक अे. अे. खान, व. वा. वाचनालयाचे ग्रंथपाल श्री. अत्रे, विविध ग्रंथालयाचे व्यवस्थापक, प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी तसेच जिल्हा ग्रंथालय कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, व. वा. वाचनालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा नियोजन अधिकारी श्री. पाटील पुढे म्हणाले की, मराठी भाषेला आपण आईचा दर्जा दिला आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक मुलगा आपल्या आईचा शेवटपर्यंत मान, सन्मान आणि आत्मसन्मान बाळगतो त्याचप्रमाणे मराठी भाषेचा आदर व्यक्त करण्यासाठी विशेष औचित्याची आवश्यकता भासू नये, मराठी भाषेचा आत्मसन्मान प्रत्येक नागरीकाच्या हृद्यात असावयास पाहिजे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व, हा दिन आयोजनामगील शासनाची भूमिका सांगून दैनंदिन जीवन जगत असताना मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन सर्व उपस्थितांना केले. तसेच माहिती व जनसंपर्क विभागाने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून प्रकाशित केलेले लोकराज्य मासिकाचा अंक देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
नुतन मराठा महाविद्यालयातील मराठी विषयाचे निवृत्त शिक्षक बी. आर. पाटील यांनी ज्ञानाचे उगमस्थान मराठी भाषा आहे. समाजातील सर्व घटकांना हे पटले पाहिजे, केवळ प्रतिष्टेपोटी इंग्रजी भाषेच्या मागे न धवता आपल्या माय मराठी भाषेचे संवर्धन करून शिक्षण, संस्कार, शिष्टाचार हे गुण अंगिकारण्यासाठी प्रत्येक नागरीकाने मराठी भाषेची कास धरणे आवश्यक असल्याचे सांगितले.
उपशिक्षणाधिकारी गणेश शिवदे यांनी शिक्षणात मराठी भाषेचे महत्व स्पष्ट करून आता शासनानेही प्रत्येक शाळेत मराठी विषय शिकविणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी शाळेत शिकविण्याचे आवाहन केले. अशी शिका मराठी भाषा या पुस्तकाचे लेखक अे. अे. खान यांनी मराठी भाषेच्या अनेक गोडव्यांविषयी उदाहरणे दिलीत.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर कवि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस मिलींद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर सरस्वती पुजन जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित यांनी केले. शेवटी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी मराठी भाषा बोलणे, लिहिणे आणि जीवनात अंगिकारण्याबाबतची तर दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढण्यासाठी दैनिक लोकमततर्फे तयार केलेली शपथ मिलींद कुलकर्णी यांनी उपस्थितांना दिली.
मराठी भाष गौरव दिनानिमित्ताने आयोजित ग्रंथ प्रदर्शनात कवि कुसुमाग्रजांच्या लेखनसाहित्यासह इतर सर्व मान्यवर लेखकांचे ग्रंथ वाचकांसाठी ठेवण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनास वाचक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी तर उपस्थितांचे आभार व. वा. वाचनालयाचे ग्रंथपाल श्री. अत्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील रामकृष्ण कोळी, दिलीप खैरणार, भूषण सोनवणे यांनी परिश्रम घेतले.