<
“केशवस्मृती” व डॉ. आचार्य कुटुंबीयांतर्फे आयोजित भागवत सप्ताहाला प्रारंभ
जळगाव : नेहमी शुभकार्य करा, ईश्वराचे स्मरण करा, परोपकार करा म्हणजे आनंदी राहाल…, असा उपदेश ह.भ.प. दादा महाराज जोशी यांनी आज शुक्रवारी येथे आयोजित भागवत कथा सप्ताहात पहिल्या दिवशी केला.
जळगावातील सामाजिक कार्यांची मुहूर्तमेढ रोवणारे स्व.डॉ. अविनाशजी (दादा) आचार्य यांच्या स्मृतीनिमित्त २८ फेबु्वारी ते ५ मार्च दरम्यान दुपारी २.३० ते ६ यावेळेत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह महाबळ रोड, जळगाव येथे प्रख्यात प्रवचनकार आणि जळगावातील चिमुकल्या राम मंदिरातील कथाकार श्री.दादा महाराज जोशी यांच्या मुखातून भागवत कथा सप्ताह होत आहे त्यात ते भागवत कथेचे निरुपण करीत होते.
दादा महाराज म्हणाले की, भागवत हा केवळ ग्रंथ नव्हे तर ती भगवंताची प्रत्यक्ष मूर्ती आहे, वाड्मय मूर्ती आहे, देवाने त्यात प्राण भरले आहेत. समाजवैष्णव होण्यासाठी भागवत कथा आयोजन केली आहे. १२ स्कंद, १८ पुराणे, २४ अवतार (तत्वे) , ६ शास्त्रांचे मंथन त्यात आहे आपण कथाच नव्हे तर जीवनोपयोगी सूत्र सांगणार आहोत. श्रद्धा, ज्ञान, वैराग्य संवर्धित व्हावे हा आपला प्रयत्न राहील. श्रेष्ठत्व हे त्यागाने मिळत असते. मानवी जीवनातील सर्वप्रकारच्या अडचणी लौकिकरित्या दूर करणारा हा ग्रंथ आहे. त्रस्त जिवाला दिलासा देणारा हा ग्रंथ आहे. हरीच्या किर्तनाने माणूस पवित्र होतो मात्र किर्तन गाणार पवित्र असा अपेक्षाही दादा महाराजांनी व्यक्त केली. निर्मोही, त्यागी, निरीश्च पिढी घडवा, दुसऱ्याचे जिवावर मौज करणे टाळा, नीती न्यायाचा विचार आम्ही आचरणात आणत नाही तोपर्यंत हे कथा निरुपण व्यर्थ असेल असा उपदेशही त्यांनी केला. अवाजवी अपेक्षांनी आपण दुखी होतो तेव्हा आत्म नियमन केले पाहिजे हेच ज्ञान भागवत सांगते.
श्रीमन नारायण नारायण हरि हरि या भजनाचा ही जयघोष झाला. भक्ती,युक्ती आणि शक्ती यांचा समन्वय साधता आला पाहिजे असा विचारही त्यांनी मांडला.
नैमिषारण्य, वृंदावन यांची महती आणि देवर्षी नारद तसेच राजा परीक्षित आणि सनक सनंद, गोकर्णाची कथा या संबंधी दादा महाराज यांनी पौराणिक संदर्भ, दाखले देत विवेचन केले. दुरितांचे तिमिर जावो, समाजाला दिशा देण्याचे काम या उपक्रमाद्वारे होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी डॉ आचार्य यांच्या कन्या डॉ आरतीताई हुजूरबाजार व जावई डॉ संजिव हुजूरबाजार, नातू शिवम तसेच केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे प्रमुख श्री भरतदादा अमळकर, क्षुधा सेवा संस्था चे प्रमुख श्री संजय बिर्ला आदि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वालन करून श्री दादामहाराजांचे स्वागत झाले.
प्रास्ताविकात श्री भरतदादा अमळकर यांनी सप्ताह आयोजनामागची भूमिका विषद केली. डॉ अविनाश आचार्य यांनी समाजसेवा हिच ईश्वरसेवा हे सूत्र आचरणात आणत अनेक सेवाभावी प्रकल्प उभे केले. हे प्रकल्प स्वतःचे जिवन मानणारे अनेक कार्यकर्त्याची फळी त्यांनी उभी केली. श्रवण हे उर्जेचे संक्रमण आहे ते समरसून केले तर अद्वितीय कार्य प्रकट होऊ शकते. नित्य, नूतन अध्यात्मिक अनुभव समाजाला मिळावा या साठी या सप्ताहाचे आयोजन केले आहे. सूत्रसंचालन श्री सुनिल याज्ञिक यांनी केले, सप्ताहाच्या यशस्वितेसाठी केशवस्मृती सेवासंस्था समूहातील सर्व प्रकल्पातील पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
जळगाव शहरातील महाबळ मार्गावरील भव्य व देखण्या संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित या कथा सप्ताहाला पहिल्याच दिवसापासून सुखद प्रतिसाद मिळाला. दुपारी २ वाजेपासूनच सर्व स्तरातील नागरिकांची वर्दळ वाढली होती.
सभागृहाचे प्रवेशद्वार, परिसर आणि भव्य मंचावरील रांगोळ्या चित्तवेधक ठरल्या. विशेषतः मंचावरील विविधरंगी पुष्प्प पाकळ्यांनी रेखाटलेली रांगोळी लोभस आणि आकर्षक ठरली. जुन्या जाणत्या आणि सह्श्रद्ध माता भगिनींनी सभागृह तुडुंब भरले होते. आरतीने सांगता झाली. शनिवारी दुसऱ्या दिवशी दुपारी ठिक २.३० वाजता निरुपणाला प्रारंभ होईल.