<
जळगांव-(प्रतिनीधी)- पुस्तक हा ज्ञानाचा सागर आहे. आपल्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी नवनवीन पुस्तके वाचली पाहिजेत, वाचनातूनच माणसाची पर्यायाने देशाची प्रगती घडेल असा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय पुस्तक न्यास विभागाच्या वतीने शहरातील व.वा. वाचनालय, नवी पेठ येथे भव्य मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन जळगांव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एज्युकेशन इरा चे मुख्य संपादक नारायण पवार, सत्यमेव जयते चे मुख्य संपादक दिपक सपकाळे, शब्बीर शहा, प्रदर्शन प्रभारी रवींद्र मोहड आदी उपस्थित होते. या पुस्तक प्रदर्शनात कथा – कादंबरी, चरित्र-आत्मचरित्र, राजकीय, सामाजिक, आरोग्य, योगासने, धार्मिक, आध्यात्मिक, व्यक्तिमत्त्व विकास, आहार, सौंदर्य अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा खजिना अत्यंत अल्प किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या पुस्तक प्रदर्शनात प्रत्येक पुस्तकावर १० % सवलत देण्यात आली आहे. तसेच हे पुस्तक प्रदर्शन २९ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२० सकाळी ११ ते ८ या वेळेत खुले राहणार आहे. नागरिकांनी या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रदर्शन प्रभारी रवींद्र मोहोड यांच्यावतीने पुस्तक प्रेमींना आवाहन करण्यात आले आहे.