<
“केशवस्मृती” व डॉ. आचार्य कुटुंबीयांतर्फे आयोजित भागवत सप्ताहात
जळगाव – (प्रतिनिधी) – भगवंताच्या नामस्मरणावर श्रद्धा असली पाहिजे, नामस्मरणावर श्रद्धा असली म्हणजे कोणतेही कार्य विनाअडथळा सहज पार पाडता येते असा उपदेश ह.भ.प. दादा महाराज जोशी यांनी आज शनिवारी येथे आयोजित भागवत कथा सप्ताहात दुसऱ्या दिवशी केला.
स्व.डॉ. अविनाशजी (दादा) आचार्य यांच्या स्मृतीनिमित्त २८ फेबु्वारी ते ५ मार्च दरम्यान दुपारी २.३० ते ६ यावेळेत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह महाबळ रोड, जळगाव येथे प्रख्यात प्रवचनकार आणि जळगावातील चिमुकल्या राम मंदिरातील कथाकार श्री.दादा महाराज जोशी यांच्या मुखातून भागवत कथा सप्ताहास प्रारंभ झाला असून त्यात ते भागवत कथेचे निरुपण करीत आहे.
दादा महाराज म्हणाले की, जिवन जगत असतांना विचारवंताच्या जवळ गेलेच पाहिजे, विचारवंताला विचारल्याशिवाय आपले विचार वाढत नाहीत व प्रगती देखील होत नाही. वैराग्य, प्रेम, ज्ञान, भक्ति यांची विविध उदाहरणे आपल्या उद्बोधनात दिली. भक्ती चे ३ प्रकार असून ईश्वर प्राप्ती साठी केली जाणारी भक्ति, प्रापंचिक भक्ति, निस्सीम भक्ति. प्रापंचिक भक्ति ईश्वरापर्यंत पोहचत नाही. कारण त्यामध्ये तणाव असतो असतो व तणाव माणसाला जेव्हा येतो तेव्हा त्यामध्ये अहंकार दडलेला असतो. भागवत हा माणसाचा अहंकार घालवतो व प्रत्येक वेळी भागवताचा अर्थ नव्याने उलगडत जातो.
सत्य हे ब्रम्ह आहे. ब्रम्ह पाहणे म्हणजे खरा व्यवहार करणे हा आहे. ब्रम्ह फक्त पुजा अर्चा करून होत नाही तर तो आचरणात आणावा लागतो ज्ञानाचा उपयोग शस्त्राने न करता सुगंधाने करावा. ज्ञानाचा वापर सत्कार्याने केल्यास ज्ञान वाढत जाते व देण्याची प्रवृत्ती वाढत जाते.
सत्कर्म म्हणजे नुसते पुजापाठ नव्हे तर चांगले कार्य करत राहणे देखील सत्कर्मच आहे. भागवतात सतकर्मालाच महत्व आहे. सामाजिक काम करणे हे देखील सतकर्मच असून सामाजिक काम करणारा व्यक्ती नारादासारखा नम्र असला पाहिजे. नम्रता हि नारदासारखी असावी बोलण्यातील, चालण्यातील, व्यक्तिपरत्वे शिष्टाचार हे सर्व नारदांचे गुण आहेत म्हणून संताच्या या मांदियाळीत नारद सामाजिक संत म्हणून प्रचलित आहेत.
महर्षी व्यासांनी ग्रंथ लिहितांना कलियुगात कोणते विचार असतील हे ओळखुनच ग्रंथ लिहले आहेत. प्रत्येक व्यक्तीची पहिली गुरु हि त्याची आईच आहे. गणपतीची पहिली गुरु देखील त्याची आईच होती. श्रीमन नारायण नारायण हरि हरि या भजनाचा ही जयघोष झाला. भक्ती,युक्ती आणि शक्ती यांचा समन्वय साधता आला पाहिजे असा विचारही त्यांनी मांडला.
केशवस्मृती सेवासंस्था समूहातील आश्रय माझे घर, मातोशी आनंदाश्रम, सेवावास्ती विभागाच्या संचालकांच्या सामूहिक आरतीने सांगता झाली. रविवारी तिसऱ्या दिवशी दुपारी ठिक २.३० वाजता निरुपणाला प्रारंभ होईल.