<
जळगाव : महाराष्ट्रात मराठी मातृभाषेचे संवर्धन करणे गरजेचे आहे. इंग्रजी भाषेचा उदोउदो कमी केला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेची संख्या वाढली असून मराठी शाळा मोठ्या झाल्या पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले.
येथील जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज रविवार दि. १ मार्च रोजी झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी आ.सुधीर तांबे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.किशोर दराडे, आ.शिरीष चौधरी, आ.राजूमामा भोळे, शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव, जिल्हा बँक अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे गफ्फार मलिक, मेजर नाना वाणी, शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम भिरूड, उपाध्यक्ष भीमराव सपकाळे, मानद सचिव मनोहर सूर्यवंशी ऊपस्थित होते.
स्वागत गीत भगीरथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी सादर केले. प्रस्तावनेत अध्यक्ष शालीग्राम भिरूड यांनी, शिक्षकांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने पतपेढीची स्थापना झाली असे सांगत सदस्यांना अल्प व्याजदरात कर्ज पुरवठा केला जातो अशी माहिती दिली. यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. आ.किशोर दराडे यांनी सांगितले की, शिक्षकांच्या पगारातून येणारा पैसा सांभाळण्याचे काम शिक्षक पतपेढीने यशस्वीपणे केले आहे. आ. राजूमामा भोळे यांनी, लोकांना विश्वासात घेऊन काम करणे हि महत्वाची बाब असल्याचे सांगत समाज घडविण्याची महत्वाची जबाबदारी शिक्षक पार पाडत असल्याचे म्हटले.
ना.गुलाबराव पाटील म्हणाले की, शिक्षक पतपेढीने कमी दिवसात सुंदर वास्तू उभारली आहे, हर घर जल, हर घर नल हे ब्रीदवाक्य घेऊन योजना घेऊन आलो आहे. शिक्षकांशी नेहमी मैत्री करावी. माणसांनी नेहमी झोपडीकडे बघून शिकावे असेही मनोगतात ना.पाटील म्हणाले. यावेळी आ. शिरीष चौधरी, मेजर नाना वाणी, गफ्फार मलिक यांनीही मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतात आ.तांबे यांनी, शिक्षक पतपेढीने नूतन इमारतीत प्रवेश करणे हा इतिहासातील आनंदाचा क्षण असल्याचे सांगत सभासदांच्या पाल्यांसाठी देखील या वास्तूचा उपयोग होईल असे सांगितले. शिक्षक पतपेढीचा विकासाचा आलेख वाढत जाण्यासाठी देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन शांताराम पाटील यांनी तर आभार मनोहर सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमासाठी गजानन गव्हारे, शरद बन्सी, अलका पाटील, हेमंत चौधरी, शुभांगिनी महाजन, संजय निकम, अजय देशमुख, शैलेश राणे, प्रकाश पाटील, जयंत चौधरी, जगदीश पाटील, वासुदेव पाटील, पुरुषोत्तम पाटील, शेख हारून, नंदकुमार पाटील, राजू चौधरी, रवींद्र बाविस्कर, वामन पाटील, राजेंद्र महाजन आदींनी परिश्रम घेतले.