<
जळगाव : येथील जिल्हा महिला असोसिएशन, तेरापंथ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन / समिती श्री न्यू शहर यांच्या सहकार्याने दि. ४ मार्च रोजी शहरातून महिलांची “वूमन्स ओन व्हील्स” हि दुचाकी रॅली दुपारी २.३० वाजता शिवतीर्थ मैदानावरून निघणार आहे. या रॅलीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा महिला असोसिएशन १५ मार्चपर्यंत विविध कार्यक्रम घेत आहे. वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध विषयांवर जनजागृती केली जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत असलेला एक भाग म्हणून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात सर्वप्रथम अखिल भारतीय तेरापंथ महिला मंडळाकडून जळगाव जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाचे कार्य करणा-या महिलांना सशक्त महिला सन्मान प्रदान केले जाणार आहेत. याप्रसंगी महापौर भारती सोनवणे, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, माजी महापौर तथा नगरसेवक सीमा भोळे उपस्थित राहतील.
त्यानंतर रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात होणार आहे. रॅलीत महिलांना केशरी साडी व युवतींना सफेद ड्रेस, लाल ओढणी असा ड्रेसकोड राहणार आहे.वाहन चालक महिलेकडे नोंदणीकृत वाहन व परवाना असणे गरजेचे आहे. रॅलीत दुचाकीवर मागे बसलेल्या महिला प्लास्टिक निर्मूलन आणि महिला सशक्तीकरण याविषयी जनजागृती करणारे फलक हाती घेणार आहेत. रॅलीत सहभागी महिलांना महापौर भारती सोनवणे यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. रॅली शिवतीर्थ मैदान, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, पुष्पलता बेंडाळे चौक, पांडे डेअरी चौक, स्वातंत्र्य चौक, बसस्थानक मार्गे पुन्हा शिवतीर्थ मैदानावर समाप्त होईल. प्रकल्पप्रमुख भारती पाथरकर, बिंदिया नांदेडकर, उर्मिला छाजेड असून शहरातील अधिकाधिक महिलांनी रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा महिला असोसिएशन, तेरापंथ महिला मंडळ आणि अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन यांनी केले आहे.