<
जामनेर-(अभिमान झाल्टे) – तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड जोमात सुरु आहे . जंगलातुन बाभुळ, आंबा, निंब, हिरव्यागार व डेरेदार झाडांची अवैध कत्तल करुन रात्री, अपरात्री,लाकूडमाफिया खुलेआम, ट्रॅक्टर कींवा मोठ्या वाहनाद्वारे फट किंवा ताडपत्री झाकुन वाहतुक करीत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
जामनेर तालुका हा मोठा भौगोलिक विस्तार असलेला तसेच घनदाट वनराई लाभलेला तालुका म्हणून ओळखला जातो.तसेच अवैध धंद्यांचे माहेरघर म्हणून देखील या तालुक्याचा नामोल्लेख केला जात असतो.त्यामुळे या तालुक्याची “सोन्याचे अंडे देणारा तालुका-किंवा सोन्याची खाण”असलेला तालुका म्हणूनही सर्वश्रुत आहे.या तालुक्यात प्रत्येक शासकीय विभागात आपली “पोस्टींग”व्हावी यासाठी अधिकारी वर्ग देव पाण्यात ठेवून असतात.या तालुक्याची ख्याती आहे ती अशी की तालुक्यात जो अधिकारी कार्यभार सांभाळतो,तो हमखास”प्रमोशन”घेऊनच जात असतो.असो,तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरिपाचा हंगाम संपला असून खरीप हंगाम संपताच तालुक्यातील लाकूड माफिया सजग झाल्याचे चित्र दिसून येत आहे.लाकूड माफियांनी वृक्षतोडीच्या माध्यमातून डोके वर काढले असून दिवसाढवळ्या वनविभागाच्या”नाकावर टिच्चून” लाकूड माफिया अवैध रित्या लाकूड वाहतूक करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित वन विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे दर्शवित असल्याचे बोलले जात आहे. शहरात वनविभागाचे कार्यालय असतांना कर्मचारी केवळ बघ्याची भुमिका घेत असुन महसुल विभागाकडून देखील याकडे डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या लाकूड माफियांवर कृपादृष्टी कोणाची.वनविभागाची की.?राजकीय पुढाऱ्यांची.?
असा सवाल केला जात आहे. वनविभागाच्या दुर्लक्षाधीन वृत्ती मुळे हिरवेगार-डेरेदार वृक्षांची, कत्तल करणाऱ्यांना चांगलेच फावले आहे . वृक्षतोड करणांऱ्या कडुन बहुपयोगी अशा वृक्षांची कत्तल केली जात आहे.त्यामुळे वृक्ष प्रेमींमधुन संतापाची भावना व्यक्त केली जात आहे . वन विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवुन पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी अवैध वृक्षतोड थांबवावी . तसेच अवैध वृक्ष् तोडीस जबाबदार कर्मचारी व लाकुड माफीया यांच्यावर कारवाई करावी.अशी मागणी वृक्षप्रेमी व सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे..