<
जळगाव दि.४ – ग्रामविकासचे शिलेदार, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे ग्रामीण व्यवस्थापन आणि अर्थकारण या विषयावर व्याख्यान आणि चर्चा दिनांक ४ मार्च २०२० रोजी के सी ई सोसायटीच्या आय एम आर मध्ये सादर झाले. या वेळी व्यासपीठावर के सी ई चे कोषाध्यक्ष सुरेश चिरमाडे, ममुराबाद च्या सरपंच आणि आय एम आर च्या माजी विद्यार्थीनी भाग्यश्री मोरे, आय एम आर च्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे उपस्थित होत्या . प्रास्ताविकात प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी ग्रामीण अर्थकारणाचे विविध पैलू आणि व्यवस्थापनातील वाढते महत्व विषद केले. पाहुण्यांची ओळख प्रणिल चौधरी याने करुन दिली. आपल्या भाषणात श्री भास्करराव पेरे-पाटील म्हणालेत, “आपल्या कामाची दिशा योग्य हवी. लोक जोडले जातात, तुमच्यावर विश्र्वास ही ठेवतात. मी काम करतांना कपटी वागतो पण हा कपटीपणा स्वतःच्या फायद्यासाठी नसतो तर गावाच्या फायद्यासाठी असतो. त्यांच्या गावात त्यांनी सुरु केलेल्या पाणी व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, धनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा वापर, रस्ते सुविधा (दुतर्फा फळझाडे लावलेले रस्ते), स्टीट लाईट, बायोगॅस नियोजन याविषयी अत्यंत विस्तृत पणे त्यांनी सांगितले. त्यासाठी टॅक्स आपले गावकरी अत्यंत जागरूकतेने भरतात. गावात आम्ही २४ तास ४ प्रकारचे पाणी पुरवतो, आरो पाणी, वापरायचे पाणी, सकाळी ६ ते ९ गरम पाणी याचा समावेश आहे. पुढे ते म्हणाले चार गोष्टींचे व्यवस्थित नियोजन केले तर देश नक्की महासत्ता होईल- त्यात स्वच्छ पाणी, स्वच्छ परीसर, वापरलेले पाणी योग्य प्रकारे जमिनीत जिरवण्यासाठी नियोजन, वृक्षसंवर्धनात फळझाडे लागवड अत्यंत महत्वाची आहे- चांगली आरोग्य वर्धक फळे हल्ली बाजारात दुर्मिळ गोष्ट आहे. तुम्ही इंजेक्शन टोचलेली फळे खाऊन तुमचे आरोग्य बिघडवत आहात. आणि शेवटचे पान अत्यंत महत्त्वाचे मुलांचे शिक्षण, याकडे योग्य प्रकारे लक्ष पुरवले गेले पाहिजे.
आपल्या देशातील बर्याच समस्या आर्थिक नसुन मानसिक आहेत. आम्ही रात्री किर्तन करतो “सोनेनाणे आम्हाला मर्तिकेसमान.. आणि सकाळी मतदानासाठी १०० रु घेतो, मग नाव का आणि कुणाला ठेवायची?
विद्यार्थ्यांशी चर्चेदरम्यान ते म्हणाले, मानसिकता बदला, तुम्ही मैत्रिणीबरोबर चहा पिता /फिरायला जाता पण तुमची बहिण मित्राबरोबर फिरलेली तुम्हाला चालत नाही. हे तुम्हाला चालेल तेव्हाच तुम्हाला मैत्रिणीबरोबर चहा पिण्याचा अधिकार आहे.
वृक्षारोपण संबंधात पण त्यांनी सांगितले की नव्या नवरा नवरीला गावात आल्यावर एक फळ झाड लावायची प्रथा आपण सुरु केली. गावातली सगळी मुले आज ताजे फळे तोडुन खातात. स्मशानात ३०० जांभळाची झाडे लावलीत.. तिथे मुले खेळायला जातात. प्रथा कोणत्याच वाईट नाही त्यांना योग्य मोड द्या. मृत व्यक्तीची राख नदीत टाकू नका, झाडे लावा ही राख तिथे टाका.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता त्यामुळे अनेक गावातील सरपंच आणि ग्रामसेवक तसेच जिल्हा परीषदेचे अधिकारी उपस्थित होते. भाग्यश्री मोरे सरपंच, ममुराबाद, माजी विद्यार्थीनी, आय एम आर, (एम बी ए बॅच १७-१९) यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. बॅंकेची नोकरी नाकारून आपण या क्षेत्रात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी आय एम आरच्या शिक्षणाचा,येथील वातावरणाचा, व्यवस्थापन अभ्यासाचा कसा उपयोग होते हे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ शमा सराफ यांनी केले.