<
अवयव दानाचा संदेश देण्यासाठी तरुणाई धावणार
जळगाव – अवयव दानाचे महत्त्व सांगण्यासाठी, आताच्या काळात असलेली अवयव दानाची गरज समाजापुढे आणण्यासाठी, अवयव दाते आणि अवयव निकामी झालेले रुग्ण यामधील वाढती दरी कमी करण्यासाठी आणि अवयव दानाचा संदेश प्रभावीपणे समाजाला देण्यासाठी असंख्य तरुणाई आणि नागरिक “ऑर्गन डोनेथॉन” या मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. छाया किडनी फाऊंडेशन तर्फे सुखकर्ता फाऊंडेशन व आनंद डायलिसीस व सुपर स्पेशालीटी किडनी केअर युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच उमवितील स्कुल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, नॅशनल सोशल सर्विस आणि स्टुडंट वेलफेअर विभागातर्फे जागतिक किडनी दिनानिमित् दि. 13 मार्च रोजी “ऑर्गन डोनेथॉन” या मॅरेथॉन चे आयोजन के.बी.सी. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात करण्यात आलेले आहे.
प्रचंड ताणतणावाचे जीवन, बदललेली जीवनशैली यामुळे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात किडनी आणि त्या प्रमाणेच इतर अवयव निकामी होणे ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे करोडो लोकांचे जीवन धोक्यात आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर अवयव दानाचा संदेश देणे आवश्यक झालेले आहे. त्या अनुषंगाने मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी जगभरात जागतिक किडनी दिवस साजरा केला जातो. याचे औचित्य साधूनच छाया किडनी केअर अॅण्ड रिलीफ फाऊंडेशन तर्फे ही मॅरेथॉन आयोजित केली आहे. या मॅरेथॉनमध्ये के.बी.सी. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच शहरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी, संस्था आणि नागरिक दि. 13 मार्च रोजी सकाळी 7 वाजेला उमविच्या नयनरम्य परिसरात धावणार आहेत. या मॅरेथॉनमध्ये विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे देखील ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे या दरम्यान मनोरंजनाचे विविध कार्यक्रम देखील असणार आहे. तरुणाईच्या हाती जग बदलण्याची ताकद असते असे म्हणतात. तरुणाईच्या पुढाकारातून सोशल मिडीया आणि इतर माध्यमातून अवयव दानाचा संदेश या निमित्ताने प्रभावीपणे देण्यात येणार आहे.
तरी जास्तीतजास्त विद्यार्थी, खेळाडू आणि नागरिकांनी या मॅरेथॉनध्ये सहभाग नोंदवावा आणि अवयव दानाचा संदेश समाजापर्यंत पोहचवावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी 9767471357, 9511995561 तसेच अधिक माहितीसाठी 9922100500 या क्रमांकांवर संपर्क साधावा.