<
मनपा आरोग्य अधिकार्यांची घेतली बैठक
जळगाव-(प्रतिनिधी) – कोरोना व्हायरसमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसले तरी सर्वांनी योग्य ती सावधनता बाळगणे आवश्यक आहे. कोरोना व्हायरस मांस, मासे, कोंबड्यांमुळे फैलत असल्याने जळगाव शहरातील सर्व मांस विक्रेत्यांना स्वच्छतेसंदर्भात नोटीस पाठवावी तसेच शहरभर जनजागृती करण्यासाठी शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्वच्छतेची महत्व पटवून द्यावे, अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी केल्या.
गुरूवारी दुपारी 2 वाजता मनपातील महापौर दालनात शहरातील मनपाच्या रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती तेव्हा त्या बोलत होत्या. यावेळी बैठकीला नगरसेवक कैलास सोनवणे, मनपा आरोग्य समितीचे सदस्य डॉ.विरेन खडके, डॉ.चंद्रशेखर पाटील, महेश चौधरी यांच्यासह उपायुक्त मिनानाथ दंडवते, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी, शहर लसीकरण अधिकारी डॉ.मनिषा उगले, डॉ.शिरीष ठुसे, डॉ.नेहा भारंबे, डॉ.विजय घोलप, डॉ.संजय पाटील, डॉ.युधिष्ठीर इंगळे, डॉ.पल्लवी पाटील, डॉ.पल्लवी नारखेडे, डॉ.सोनल कुलकर्णी, डॉ.सायली पवार, डॉ.हेमलता नेवे आदी उपस्थित होते.
मनपा रूग्णालयामार्फत योग्य ती खबरदारी घ्या
मनपाच्या रूग्णालयामार्फत कोरोना व्हायरस रोखण्यासाठी योग्य ती खबरादारी घ्यावी. कोरोना व्हायरसचे स्त्रोत, प्रसार माध्यम, लक्षणे, निदान, प्रतिबंध, उपचार, गैरसमज याबाबत नागरिकांना माहिती द्या. जनजागृतीसाठी पारिचारिका व आशा सेविकांची मदत घ्या. संशयीत रूग्ण आढळून आल्यास तात्काळ त्याचे नमुने घेवून पुण्याला तपासणीसाठी पाठवा अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या.
शाळा, महाविद्यालयात जनजागृती करा
जळगाव शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीमार्फत पत्रक काढून सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेची महत्व पटवून द्यावे. आवश्यकता भासल्यास डॉक्टरांकडून त्याठिकाणी माहिती देण्यास सांगावे असेही महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.
कत्तलखाने बंद ठेवावे
शहरात असलेल्या सर्व मांस विक्रेत्यांना स्वच्छतेसंदर्भात नोटीस पाठविण्यात यावी तसेच उघड्यावर मांस विक्री करणार्यांवर कारवाई करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या. इस्लामपुरा सारख्या दाट वस्तीच्या परिसरातील कत्तलखाने काही दिवसांसाठी बंद ठेवावे असे महापौरांनी सांगितले.
रंगपंचमीचा उत्सव टाळण्याचे आवाहन
गर्दीच्या ठिकाणी एखादा कोरोना संसर्गग्रस्त व्यक्ती गेल्यास त्याचा फैलाव होण्याची शक्यता मोठ्याप्रमाणावर असते. पुढील आठवड्यात होणार्या रंगपंचमी उत्सवाचे शहरात खान्देश सेंट्रल, नेहरू चौक, काव्यरत्नावली चौकासह अनेक ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे. परंतु शहरवासियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने यंदाचा रंगपंचमी उत्सव टाळण्याचे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.