<
महापौर, स्थायी समिती सभापतींनी घेतली बैठक : शहरात मनपा उभारणार स्वच्छतागृह
जळगाव-(प्रतिनिधी) – शहरात महिला स्वच्छतागृहांची कमतरता असल्याने महिलांची मोठी कुचंबना होत असते. मनपाकडून शहरात लवकरच स्वच्छतागृह उभारण्यात येणार असून तोवर महिलांना शहरातील हॉटेल्स, पेट्रोल पंपाचे स्वच्छतागृह वापरण्यास द्यावे असे आवाहन महापौर, स्थायी समिती सभापती व महिला, बालकल्याण सभापती यांनी केले असता त्यास सर्व मालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
गेल्या महिन्यात एक महिला उघड्यावर लघुशंकेसाठी बसल्याने तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. घटनेची माहिती कळताच निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते यांच्याकडून महापौर व स्थायी समिती सभापतींना याबाबत उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यावर गुरुवारी मनपात महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा, महिला व बालकल्याण सभापती शोभा बारी यांनी हॉटेल्स, पेट्रोल पंप मालक आणि डॉक्टरांची बैठक आयोजित केली होती.
बैठकीला नगरसेवक कैलास सोनवणे, अतुलसिंग हाडा, मनोज काळे, डॉ.दीपक पाटील, डॉ.जितेंद्र कोल्हे, डॉ.स्नेहल फेगडे, डॉ.सारिका पाटील, निधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते, पेट्रोल पंप मालक लक्ष्मीकांत चौधरी, प्रकाश चौबे, कुशल गांधी, रामेश्वर जाखेटे, हॉटेल असोसिएशनचे ललित पाटील, विजय चौधरी, राजेंद्र पिंपळकर, अनिल कावनी आदी उपस्थित होते.
बैठकीत सुरुवातीला स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा यांनी आपापल्या आस्थापनेतील स्वच्छतागृह महिलांसाठी खुले करण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच मनपा लवकरच शहरात 17 ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पेट्रोल पंप चालक, हॉटेल्स मालकांचे सहकार्य
पेट्रोल पंपाच्या दर्शनी भागात स्वच्छतागृह सार्वजनिक वापरासाठी असल्याबाबत फलक लावण्यावर कंपनीचे निर्बंध आहे. परंतु सर्व पेट्रोल पंपावर ठळकपणे स्वच्छतागृह उल्लेख करण्याचे आश्वासन पेट्रोल पंप चालकांनी दिले. तसेच स्वच्छतागृहांचा उपयोग करण्यास कोणत्याही महिलेला रोखले जाणार नाही यासाठी संबंधित कर्मचार्यांना सूचना देवू असेही त्यांनी सांगितले. शहरातील केवळ जेवणाची सोय असलेल्या हॉटेलमधील स्वच्छतागृह महिलांसाठी वापरू देण्याचेही हॉटेल्स मालकांनी मान्य केले.
डॉक्टर असोसिएशन, हॉटेल्स मालक उभारणार स्वच्छतागृह
जळगाव शहरात महिलांची होणारी अडचण लक्षात घेता महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यास डॉक्टर असोसिएशनकडून सर्वातोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थित डॉक्टरांनी दिले. तसेच हॉटेल्स असोसिएशनने देखील आश्वासन दिले आहे. उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची मनपा प्रशासनाने स्वच्छता ठेवण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.