<
जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीतर्फे दि. ७ ते १२ मार्च दरम्यान मुंबई येथे “महिला कला महोत्सवा”चं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवात परिवर्तन निर्मित ‘नली’ एकलनाट्याचा प्रयोग सादर होणार आहे. पु. ल. देशपांडे अकादमीतर्फे दरवर्षी अशा प्रकारचा महिला कला महोत्सव आयोजित करण्यात येतो. यात साहित्य, नाट्य, संगीत, नृत्य विविध कलांचे सादरीकरण होत असते. महिला दिनाच्या अनुषंगाने दि. ८ मार्च रोजी सायं. ५ वा. प्रभादेवीयेथील अकादमीच्या मिनी थिएटरमधे ‘नली’चा प्रयोग होणार आहे. ग्रामीण भागातील शिक्षण, सामाजिक परिस्थिती, महिलांचे प्रश्न, गावगाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अशा अनेक विषयावर हे एकलनाट्य भाष्य करते. नली नाटक साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी श्रीकांत देशमुख यांच्या व्यक्तीचित्रणावर आधारीत असून शंभू पाटील यांनी नाट्यरूपांतर केले आहे तर दिग्दर्शन योगेश पाटील यांचे आहे. सादरीकरण हर्षल पाटील, पार्श्वसंगीत मंगेश कुलकर्णी, प्रकाश योजना राहुल निंबाळकर यांचे आहे. नारायण बाविस्कर व पुरूषोत्तम चौधरी हे निर्मिती प्रमुख आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेशात या एकलनाट्याचे ४२ प्रयोग झाले आहे.