<
जळगाव(प्रतिनिधी)– थॅलेसेमिया बाधित आजारावर एकमेव उपचार म्हणजे बोनमॅरो ट्रान्सप्लांट होय. बोनमॅरो ट्रान्सप्लांटसाठी करावयाच्या एचएलए टायपिंग तपासणी करण्याचे शिबीर रेडक्रॉस आणि गोळवलकर रक्तपेढी संयुक्त विद्यमाने 18 मार्च रोजी रेडक्रॉस भवन सिव्हिल हॉस्पिल शेजारी जळगांव येथे आयोजित करण्यात आले आहे. जळगांव जिल्ह्यात प्रथमच हे शिबीर होत असून थॅलेसिमिया बाधित रुग्णांनी ११ मार्च पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन डॉ. सई नेमाडे आणि डॉ. प्रसन्न रेदासनी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.थॅलेसेमिया या आजारावरील एकमेव उपाय म्हणजे बोनमॅरो ट्रान्सप्लांट आणि त्यासाठी सुमारे १५ते २०लाख इतका खर्च येतो. मात्र पंकज उधास यांच्या पटूट संस्थेमार्फत एचएलए टायपिंग तपासणी पूर्णत: विनामुल्य करणार आहोत. या तपासणी शिबीरामुळे थॅलेसेमिया बाधित रुग्णांना दिलासा मिळणार आहे. शिबीरात रुग्णाचे आणि त्याच्या भाऊ बहिणीचे एचएलए टायपिंग तपासणी करण्यात येणार आहे. सकारात्मक एचएलए क्रॉसमॅचिंग झाल्यानंतर योग्य वेळी बोनमॅरो ट्रान्सप्लाँट शस्त्रक्रिया करण्याचे प्रयोजन केले जाईल. या शस्त्रक्रियेसाठी पटूट संस्थेमार्फत भरीव आर्थिक सहकार्य आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. जळगांव जिल्ह्यात २०० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. या रुग्णांना नियमित सतत रक्त द्यावे लागते. वेळेत उपचार मिळावेत व त्यांचा खर्च वाचावा या उद्देशाने एचएलए क्रॉसमॅसिंग शिबराचे आयोजन माधवराव गोळवलकर ब्लड बँक आणि इंडियन रेड क्रॉस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. जळगांव जिल्ह्यातील सख्खे भाऊ,बहिण असलेल्या थॅलेसेमिया रुग्णांनी १८ रोजी सकाळी ९ वाजता उपस्थित रहावे मात्र ११ मार्च पूर्वी रेडक्रॉस रक्तपेढी किंवा गोळवलकर रक्तपेढी मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. या संयुक्त पत्रकार परिषदेला रेडक्रॉस उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी सहसचिव राजेश यावलकर, रक्तपेढी सचिव अनिल काकरिया, गोळवलकर रक्तपेढीचे डॉ. नितीन चौधरी, केशव स्मृतीचे सचिव रत्नाकर पाटील, आरोग्य विभाग प्रमुख भानुदास येवलेकर उपस्थित होते.