<
महिला सफाई कर्मचार्यांचा महापौरांकडून साडीचोळी देवून सन्मान
जळगाव, दि.8 – आजच्या काळात कुणीतरी आपल्याला सन्मान देईल याची वाट न बघता तो सन्मान कसा मिळवया येईल याचा विचार महिलांनी करायला हवा. आपल्यावर होणारा अन्याय आपण सहन करणार नाही तरच सन्मान मिळेल, त्यामुळे महिलांनो सन्मान मिळवायला शिका आणि आवश्यक असेल त्याची मदत घ्या असे आवाहन, समाजसेविका हेमाताई अमळकर यांनी केले.
वर्षभर शहरातील कचरा साफ करून जळगावकरांसाठी सेवा बजावणार्या उत्कृष्ट महिला सफाई कर्मचारी कायम दुर्लक्षित असतात. यंदाचा महिलादिन मात्र त्यांच्यासाठी आनंददायी ठरला आहे. मनपाची स्थापना झाल्यापासून आजवर कुणीही महिला सफाई कर्मचार्यांचा सन्मान केलेला नव्हता. समाजाती सर्वात शेवटच्या घटकाचा सन्मान करण्याचा नवीन पायंडा महापौर भारती सोनवणे यांनी रचला. महिला दिनाचे औचित्य साधत महापौर भारती सोनवणे यांनी सफाई कर्मचारी महिलांचा साडीचोळी देऊन गौरव केला. मनपा इमारतीमधील दुसर्या माळ्यावर असलेल्या सभागृहात सायंकाळी 5 वाजता महापौर भारती सोनवणे यांनी महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्षस्थानी समाजसेविका हेमाताई अमळकर, स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा, महिला व बाल कल्याण सभापती शोभाताई बारी, शिवसेना गटनेते अनंत जोशी, नगरसेवक कैलास सोनवणे, उपायुक्त मिनीनाथ दंडवते, नगरसेवक सदाशिव ढेकळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष मराठे यांनी केले. महिला दिनानिमित्त 10 आरोग्य युनिटमधील 40 उत्कृष्ट महिला स्वच्छता कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला.
स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा यांनी सांगितले की, महिला मुळातच प्रामाणिक असतात आणि त्यांना जबाबदारीची जाणीव असते. शहराची स्वच्छता करताना स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी. स्वच्छता करताना वापरण्यास मनपाने दिलेल्या वस्तूंचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना गटनेते अनंत जोशी म्हणाले की, महापौर पद कैलास सोनवणे यांच्या कुटूंबात आले तेव्हा आम्हाला प्रचंड आनंद झाला. कैलास सोनवणेंकडे जेव्हा जेव्हा चांगले पद आले तेव्हा त्यांनी काहीतरी नाविन्यपूर्ण काम केले आणि यापुढे देखील ते घडत राहिल. महिलांनी शहराची स्वच्छता करताना स्वतःची देखील काळजी घ्यावी असेही ते म्हणाले.
उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी, महिलाभगिनी प्रामाणिकपणे काम करीत असल्याचे आजवर निर्देशनास आले असल्याचे नमूद केले. महिलांचा सन्मान घरातूनच व्हायला हवा. महिला सोशिक आणि बचती असतात. बचत ही काळाची गरज असून ती आपल्याला महिलांकडून शिकायला मिळते असे सांगत महिलांनी बँकेत खाते उघडून बचत करायला हवी असे आवाहन त्यांनी केले.
सफाई कर्मचारी नव्हे मेडीकल इंजिनिअर
जळगाव शहराची दररोज स्वच्छता करणार्या सर्व महिला सफाई कर्मचारी नव्हे तर शहराच्या मेडीकल इंजिनिअर आहेत. प्रत्येक रोगराई त्या सर्वप्रथम स्वतःच्या अंगावर घेतात आणि शहर स्वच्छ ठेवतात असे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सांगितले. तसेच कोरोना व्हायरस शहराच्या वेशीपर्यंत येवून पोहचला असून तत्पूर्वी आरोग्याचे टेंडर प्रशासनाने लवकरात लवकर उघडावे असे आवाहन देखील कैलास सोनवणे यांनी केले. शहरातील स्वच्छतेसाठी महापौरांनी मास्टर प्लॅन तयार केला असून तो अंमलात आणल्यानंतर राज्यात नवा पॅटर्न तयार होईल असेही सोनवणे यांनी सांगितले.
महापौरांकडून शुभेच्छा आणि आवाहन
जागतिक महिला दिनानिमित्त महापौर भारती सोनवणे यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. तसेच दोन दिवसांवर येवून ठेपलेला रंगपंचमीचा उत्सव यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचेही त्यांनी सांगितले. दोन दिवसापूर्वी महापौर भारती सोनवणे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत साहस फाऊंडेशनच्या सरीता माळी, नेहरू चौक मित्र मंडळाचे अजय गांधी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रंगपंचमी उत्सव टाळण्याचे मान्य केले.