<
मुंबई-(प्रतिनिधी)- प्रेम, नकार आणि हिंसा या विषयावर परिषद भरविण्यात आली आहे. परिषद भरविणाऱ्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.नव्या फॅसिसमच्या पर्वामध्ये जाती व्यवस्था आणि स्त्री दास्य यातून उदयास आलेल्या सामाजिक -राजकीय घटकांचा ते विचार करत आहे. निवडणुका आल्या आणि गेल्या राजकीय झुंडीला मात्र त्यांनी राजकीय आधार मिळवून दिला आणि संसदीय राजकारणामध्ये अभूतपूर्व अशी त्यांनी मुसंडी मारली. हा नवा फॅसिसम संसदीय संस्थाच्या आणि संविधानिक शक्ती स्रोतांचा आपल्या जाती पितृसत्ता वर्चस्वासाठी पुरेपूर वापर करत आहे. सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी लढणाऱ्या चळवळींनी या घटनांच्या मुळाशी असणाऱ्या तात्त्विक व राजकीय तसेच विचार प्रणालीच्या शक्ती स्रोतांना अजूनही पुढे आणलेले नाही परिणामी धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचे संरक्षण संविधानात्मक संरक्षणाचा मुद्दा प्रश्नचिन्ह म्हणून उभा आहे.हि परिषद ह्या मुद्यांना भिडण्याचे आश्वासन देते असे दिसले पाहिजे. समता आणि स्वातंत्र्य निधर्मवाद आणि मूलभूतहक्क यासाठी लढणाऱ्या कार्यकर्ते आणि चळवळी यांना मी अभिवादन करतो.प्रेम ,नकार आणि हिंसा याची चर्चा महाराष्ट्रात गेल्या 20 वार्षांपासून आहे ,प्रत्येक तरुण तरुणीला प्रेमाचा अधिकार असतो आणि या प्रेम संबंधाला नकार देण्याचाही अधिकार असतो.लोकशाही मार्गाने विचार विनिमयाने सलोख्याच्या संबंधांकडे आणि आदर्श विवाह संस्थेकडे मार्गक्रमण होऊ शकते, परंतु सामाजिक व्यवस्था विषमता पारतंत्र्य आणि क्रौर्य अशा शक्तीस्रोतांनी देखील बनलेली असते.विशिष्ठ परिस्तितीमध्ये समतोल भंग पावतो आणि बहुधा प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीचा खून होतो, वरवर पाहता प्रेम, नकार आणि हिंसा यांची घडामोड व्यक्तिगत संबंधावर उभी असल्याचा भास होतो.प्रत्येक्षात त्यामागे वर्ण- जाती व्यवस्थेचे क्रौर्य पितृसत्ता व स्त्री दास्य यावर आधारलेल्या प्रवृत्ती भांडवलशाहीतील आर्थिक शोषण हुकूमशाहीतील धर्मान्धता यांचे खोलवर रुतलेले शक्तीस्रोत असतात.या शक्ती स्रोतांना उजागर केले पाहिजे. बुद्ध ते फुले- आंबेडकर यांच्या वारशाचा मुक्तिध्वज उंच उभारला पाहिजे. आद्य गण माता निरुत्ती ते सत्यशोधक मुक्ता साळवे,सावित्रीबाई, यांच्या कृतीचा जयजयकार करत नवा इतिहास घडविण्याच्या दृष्टीने आगेकूच केली पाहिजे. याच दृष्टीने मी दोन शब्द बोलणार आहे.
परिषदेने कोणती दिशा स्वीकारावी हा मुद्दा चर्चेसाठी पुढे आणणार आहे. रिंकू पाटील जाळन्यात आली, कारण तिने प्रेमाला नकार दिला, अमृता देशपांडेला तिच्या प्रियकराने भोकसले आणि ठार केले,तिच्या तडफडत्या रक्ताला साक्ष ठेऊन लढले पाहिजे. पुण्यात नीता हेंद्रेचा खून झाला तिच्या कोंडलेल्या श्वासामागे तिच्या प्रेरणा घेतल्या पाहिजे. विद्या प्रभू देसाईला मुंबईत जिवंत जाळले चेऱ्यावर ऍसिड फेकून नकार देणाऱ्या तरुणीचे जीवन संपवले. हा केवळ विकृतीचा भाग नाही, केवळ तात्कालिक पुरुषी प्रवृत्ती नाही ,तर बदलत्या समाज व्यवस्थेत वेगाने उसळणाऱ्या भांडवली प्रवृत्ती पुरुष सत्ता आणि जातीय शोषण दमन या सर्व घटकांचा हा परिणाम आहे. म्हणून आपला लढा व्यक्तिगत दुष्कृत्यांचा पाढा नाही, हि परिषद म्हणूनच वरील सर्व पायाभूत भौतिक आधारांची चिकित्सा करण्याकडे आपणास घेऊन जाईल अशी मी अपेक्षा करतो. आणि या परिषदेचे उदघाटन झाले घोषित करतो.
या परिषदेने आपली हत्यारे ह्या भारतीय प्रबोधनासाठी सज्ज ठेवावी असे आव्हान मी करतो. त्या दृष्टीने चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या काही दिशा सूत्रे आपणा समोर मांडतो. पुढील सूत्रांबाबत परिषदेने ठरावाच्या स्वरूपात मार्गदर्शक व्हावे ,अशी आकांशा व्यक्त करतो. या परिषदेने जातीव्यस्था अंताचा प्रश्न अजेंडयावर आणला पाहिजे,याचे कारण जाती व्यवस्थेच्या दमनकारी आणि शोषक स्वरूपामूळे भारतीय समाजात तरुण- तरुणी खरे प्रेम करूच शकत नाही.अनेकवेळा प्रेम झाल्याचा भासच तरुण तरुणींना होतो. ते प्रेम भासापुरते राहते आणि जातीय भांडवली मूल्यांच्या धुमश्चक्रीत कधीच अंतर्धान पावते.वर्ण व्यवस्था व जाती व्यवस्था यांनी विवाह विषयक मनूने दंडक निर्दयीपणे राबवली. त्यामुळे मनापासून प्रेम करणे बहुसंख्ये स्त्री-पुरुषांना अशक्यच होते. उच्च जातीयांनी लादलेले प्रेम हि एकतर्फी सक्ती होती. आजही श्रम कार्यातील स्त्री पुरुषांनी उच्च जाती वर्गासाठी उत्पादन करणारे शूद्राती शुद्र राहावे, या पद्धतीने दंडक योजना कार्य करते, त्यामुळे आजची हिंसा आणि नकार यांचे स्वरूप समजून घेतले पाहिजे. त्या शिवाय हिंसे विरोधात मुकाबला होणे शक्य नाही.
प्रेम,नकार आणि हिंसा या सूत्राला आधार देणारी महत्वपूर्ण शक्ती आहे पितृसत्ता. पितृसत्ता म्हणजे समाजात कुटुंबात पुरुषांच्या हातात सत्तेचे केंद्रीकरण असणे वारसा हक्क, मालमत्ता यांचा हक्क, हा स्रियांना परंपरेने मिळत नाही. परिणामी स्रिया आर्थिकदृष्टया दुर्बल राहतात.स्त्रीयांनी आपले शरीर अथवा मन ऋषी पुरुष किंव्हा शूर पुरुष यांच्या अधीन करावे,स्त्रीयांनी व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करू नये.असे पवित्र दंडक मनुस्मुर्ती लादते.पुरुषाने जिंकावे आणि स्त्रीयांनी शरण जावे हि हजारो वर्षांची धर्म परंपरा आहे त्यामुळे परशुराम आपल्या बापाच्या आदेशाने आपल्या आईचे मुंडके उडवतो. इंद्राच्या कुकर्माची शिक्षा अहिलेला दिली जाते. सीतेवर स्वशील भंग केल्याचा आरोप केला जातो.अग्निदिव्य केल्यानंतरही तिला हाकलले जाते. या घटनांमध्ये सूचित करण्यात येते कि, स्त्रीला अशुद्ध करण्याचा अधिकार पुरुषांना आहे. अरबस्तान, अफगाणिस्तान यात स्रियांवर आधी शिक्षा लादली जाते त्यांनी ईश निंदा केली आहे असा आरोप ठेवला जाते, म्हणून त्यांना दगडाने ठेचून मारण्यात येते .त्यानंतर न्यायालयीन निर्णय येतो कि त्या शुद्ध होत्या.
आजही विविध जातीत शेकडो महिला परित्यक्ता म्हणून कुंभमेळ्यात सोडून देण्यात येतात.स्त्रीयांच्या चारित्र्यांवर वादळ उठून त्यांना कुटूंबातून हाकलून देण्यात येते काश्मीरमध्ये स्रिया बलात्कारी गुंडांना बळी पडतात, त्यांना संरक्षण देणारी यंत्रणा नाही.
आपल्या विषमतेवर उभ्या समाजात आर्थिक दुरष्टया पुरुष अधिक बलवान असतो,स्त्री अधिक बलहीन असते.साधन संपत्तीची मालकी पुरुष पतिकडे असते. विवाहास नकार देणाऱ्या तरुणीला ठार करण्याची सत्ता त्याच्या आर्थिक व शारीरिक सत्ता सामर्थयात असते. मालमत्तेचा हक्क, घरा वरील हक्क, शासकीय सुविधांची प्राप्ती यात पुरुषाचा अरेरावीपूर्ण असा शिक्का असतो. त्यामुळे हजारो गावांमध्ये परीत्येकता आणि विधवा निराधार असतात त्यांच्या शोषणाच्या कथांची दखल घ्यावी आणि संघर्ष द्यावा हि प्रेरणा भांडवली जगात अधिकाधिक कमजोर होत आहे.
स्त्री पुरुष भेद दोघांतील विषम दर्जा हि स्थिती वर्ग समाजात असते, परन्तु जाती समाजात ह्या विषमतेला दंडुकाधारी जात पंचायत आणि नाते- गोते संबंध यांचा आधार मिळतो.प्रत्येक्ष खून झाल्यामुळे तो दडपला जातो. कारण लोकशाहीत सत्ताकरणात पुरुषांनी निर्दोष सुटणे याला जातीय सत्तेचा आधार मिळतो. स्रियांवर हिंसा विविध मार्गांनी लादली जाते. शिक्षण आणि आर्थिक सुविधा यातील प्रभावी सहभागापासून ग्रामीण भागात रोखले जाण्याचे प्रमाण मोठे आहे. जमात रुढीनुसार काही जमातीत स्रियांना वारसा हक्क नसतो, तर शहरी भागात स्त्रीला संपत्तीच्या वाट्यात सहभाग देण्यात येत नाही.या रूढीचा परिणाम स्रियांना परावलम्बी करण्यात व पुरुषांना सबल करण्यात होतो. घर आणि शाळा यांच्या प्रांगणात असलेली विषमता खुनी गुन्हेगारांचे हात बळकट करत असतात.
आधुनिक भांडवलशाहीत भांडवलहि निर्धारशक्ती असते ती विविध आघाड्यांवर पुरुषासत्ता बळकट करण्याचे काम करते. तिच्यामूळे स्रियांमधील बेरोजगारी वाढते आहे.श्रमकार्यातील तिचा वाटा घसरता आहे, स्त्रीयांचे हे परावलंबन त्यांना हतबल बनवते,तर पुरुषी हिंसेला प्रोत्सान देते.म्हणून या परिषदेने भारतीय प्रेमाचे विध्वसक शक्ती असलेल्या जाती व्यस्थेशी संघर्ष दिला पाहिजे.स्त्री दास्यांचा उगम वर्ग व्यवस्थेत झालेला नाही हे लक्षात घेऊन लढले पाहिजे. भारतातील दमन आणि शोषण सामाजिक व राजकीय प्रक्रियेला हिंसेकडे खेचून नेते स्त्री जातीवर हिंसा लादणारी परिस्थिती सामुदायिक व्यस्थेत हिचा जन्म झाला. (मार्क्सवाद,फुले आंबेडकर वाद- शरद पाटील) दलित स्त्री हि आर्थिक दृष्ट्या अधिक शोषित आहे, त्यामुळे शोषक अर्थव्यवस्था बदलण्यात ती प्रेरक शक्ती म्हणून कार्य करू शकते. सर्वात जास्त शोषण आणि दमन भटक्या जमातीतील पुरुष सत्ता करते.तिच्या दास्याला आधार जमात व्यवस्था आणि वर्ग व्यवस्था आहे, या विरोधात संघर्ष केला पाहिजे.