<
ममुराबाद गावात दारुबंदी साठी एकवटलेल्या संपूर्ण महिला शक्तिचा प्रातिनिधिक स्वरुपात साडीचोळी व गीता देऊन गौरव
जळगांव(प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनानिमित्ताने सुधर्मा सामाजिक संस्थेच्या वतीने ममुराबाद गावातील ६ सामान्य पण दारुबंदी साठी लढा पुकारलेल्यामहिलांचा गौरवाचा कार्यक्रम ममुराबाद ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीला गावच्या प्रथम नागरिक सरपंच कु.भाग्यश्री गोपाळ मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे व सुनिता बेलसरे यांचा ममुराबाद ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार केला. त्यानंतर आज महिला दिनाच्या निमित्ताने सुनिता बेलसरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सुधर्माच्या कार्याचा थोडक्यात परिचय सर्व महिलांना करून दिला व त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा ही दिल्या. त्यानंतर जमलेल्या सर्व महिलांनी आम्ही या गावात दारूबंदी करून दाखवूच अशी शपथ घेऊन निर्धार व्यक्त केला. यावेळी आम्ही दारूबंदी साठी काय काय केले ते सर्व या महिलांनी सांगितले. गावातील रामराज्य ग्रुप चे तरुण अध्यक्ष निखिल शरद पाटील व त्यांच्या मातोश्री अश्विनी शरद पाटील यांचा दारुबंदी साठी जागरूकता निर्माण केल्या बद्दल गीता व साडीचोळी, गुलाबपुष्प देऊन सर्वप्रथम सत्कार करण्यात आला. यानंतर अनुक्रमे सुनंदा विजय पाटील, मीनाबाई महेंद्र पाटील, आशा रामकृष्ण पाटील, उज्वला नाना पाटील व मंगला तारासिंग माळी या महिलांनाही साडीचोळी, गीता देऊन सुनिता बेलसरे, सरपंच भाग्यश्री मोरे, हेमंत बेलसरे यांचे हस्ते गौरविण्यात आले.