<
जळगाव( दि.11) प्रतिनिधी- श्री. गोविंदराव पाटील, गोविंदराज ड्रीप अॅण्ड स्प्रिंकलर एजन्सीज यांनी मे. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांचेकडून वेळोवेळी खरेदी केलेल्या ठिबक / तुषार सिंचन संचाच्या अंशत: पेमेंट पोटी त्यांनी रु. 5,34,141 रकमेचा धनादेश दिलेला होता.
परंतु वितरकाचे बँक खातेवर पुरेशी रक्कम नसल्यामुळे बँकेने तो न वटवता परत पाठवला. त्याबद्दल त्यांना वकीलामार्फत सुचनापत्रही पाठवले. त्याची त्यांनी दखल न घेतल्याने नाईलाजास्तव वसुलीसाठी न्यायालयात जाऊन कलम 138 सह कलम 141 अन्वये फौजदारी तक्रार दाखल करावी लागली.
संपूर्ण तपासाअंती कायद्याचा आधार घेऊन मा. न्या दंडाधकारी प्रथम वर्ग यांचे पिठासीन अधिकारी श्री.गिरीजेश कांबळे यांनी श्री. गोविंदराज पाटील यांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा तसेच मुळ मुद्दल रु. 5,34,141/- व त्यावरील व्याज मिळुन रु. 8,00,000/- दंड आकारला आहे. दंड न भरल्यास श्री. गोविंदराव पाटील यांना चार महिन्याचा कारावास भोगावा लागेल असेही स्पष्ट केलेले आहे.
”जर एखाद्या व्यक्तीने धनादेश दिला असेल तर तो हे म्हणून स्वत:चा बचाव करु शकत नाही की सदरचा धनादेश हा कोऱ्या स्वरुपात दिला होता. एकदा धनादेश दिला म्हणजे तो कायदेशीर दायत्वापोटीच दिला हे गृहितक आहे’’ असेही निकालात स्पष्ट केले आहे.
फिर्यादीतर्फे अॅड. निशांत अत्रे तर आरोपीतर्फे अॅड. चंद्रकांत कछवे यांनी काम पाहिले.
कायद्याचे कलम 138 नुसार आरोपीला न वटवलेल्या चेकची रक्कम व्याजासहित देय आहे, अन्यथा कारावास भोगावा लागेल हे परत एकदा स्पष्ट झालेले आहे असे या निर्णयातून दिसते.