<
ठाणे(प्रतिनिधी) -ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी मोठ्या आवाजाच्या वाद्यांना विरोध करून मोठ्या जोशात पारंपरिक ढोल-ताशा वाजवणाऱ्या तरुणींचे मातृत्व धोक्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अवजड ढोल तासन्तास कंबरेला बांधल्याने गर्भाशयावर ताण येऊन गर्भधारणा होण्यात अडचण येत असल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे.
नऊवारी साडी, कपाळावर चंद्रकोर, नथ, मराठमोळे दागिने आणि डोक्यावर तुर्रेदार फेटा घालून ढोल-ताशा वाजवणाऱ्या तरुणींमध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवते. नववर्ष स्वागतयात्रा, गणेशोत्सव, शिवजयंती आदी कार्यक्रमांत ढोल-ताशा पथक दिसतात. वाद्य पारंपरिक असली तरीही त्यातून निघणाऱ्या ध्वनी लहरींचा जसा ऐकणाऱ्यांच्या कानांवर परिणाम होतो, तसाच तो वादकाच्या शरीरावरही होत असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. सहा-सात किलोचा ढोल कंबरेला बांधून तासन्तास वाजवणाऱ्या तरुणींच्या गर्भाशयाला धक्के बसून त्या कमकुवत होत असल्याने भविष्यात गर्भधारणेत अडचणी येत असल्याची धक्कादायक माहिती पुण्यातील श्रवण तज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके यांनी ‘सकाळ’ला दिली. डॉ. मांडके यांनी ध्वनिप्रदूषणावर केलेल्या अभ्यासातून हे निरीक्षण नोंदवले आहे.
ढोल-ताशे वाजवण्याचा फार मोठा दुष्परिणाम दुर्लक्षित राहिला आहे. ही वाद्ये कंबरेला किंवा पोटाला बांधलेली असतात. त्यांची मूलभूत वारंवारता (फंडामेंटल फ्रिक्वेन्सी) २० हर्टझपेक्षा कमी आहे आणि ती शरीराला अपायकारक आहे, याची नोंद घ्यायला हवी. याचे दुष्परिणाम कालांतराने दिसून येतात. खासकरून तरुणींना याचा सर्वाधिक त्रास होऊ शकतो, असेही डॉ. मांडके यांनी सांगितले.
ध्वनिक्षेपकांच्या भिंतींना चाप बसला हे फार चांगले झाले. आता परंपरागत वाद्यांबाबतही विचार व्हायला हवा. ढोल-ताशेही ध्वनिप्रदूषणास तितकेच कारणीभूत ठरतात. त्यामुळे त्यांच्याही आवाजाच्या पातळीची नोंद व्हायला हवी. वाद्य किती वेळ वाजवायचे, त्यांची संख्या किती हवी, वादन सुरू असताना मध्येच विश्रांती किती घ्यावी, याचाही विचार आवश्यक आहे. यासंदर्भातही न्यायालयीन पातळीवर दखल अपेक्षित आहे.