<
कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) – कासोदा येथील नागरीक व्यवसायानिमित्त संपूर्ण भारतात दूरपर्यंत सतरंजी विकणे कामी फिरत असतात.त्यानिमित्ताने येथील नागरिक कोरोना विषाणूच्या भीतीने आता गावाकडे परत येत आहेत.त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या अशा नागरिकांची तपासणी होणे गरजेचे असल्यामुळे अद्याप येथे एकही वैद्यकिय सुविधा उपलब्ध झालेली दिसत नाही.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती जीर्ण झाल्याने येथील काही शस्त्रक्रिया विभागासह अनेक विभाग बंद अवस्थेत आहेत.अशातच एखादा कोरोना व्हायरस पीडित रुग्ण अचानकपणे गावात आला तर मात्र येथील वैद्यकीय सेवेसह अनेकांची धांदल उडल्याशिवाय राहणार नाही.त्यासाठी अगोदरच उपाययोजना जिल्हापरिषद अथवा जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेतर्फे होणे गरजेचे आहे.असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.त्या कामी ग्रामपंचायतीसह लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष देऊन सदर समस्येवर तोडगा काढण्याची मागणी होतांना दिसत आहे.