महिला रुग्णांनी अत्यावश्यक असेल तरच रुग्णालयात एका नातेवाईकासह यावे-स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र संघटनेचे आवाहन

जळगाव : जिल्ह्यातील महिला रुग्णांनी अत्यावश्यक असेल तरच रुग्णालयात एका नातेवाईकासह यावे. स्त्री रोगविषयक समस्यासाठी फोनवर सल्ला घ्यावा असे आवाहन स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र संघटनेने केले आहे. 
सध्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. आजार होऊ नये या करिता घरातच राहण्याच्या सूचना देत राज्य शासनाने खबरदारी घेण्यास सांगितले आहे. जळगाव जिल्हा स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र संघटनेच्यावतीने महिला रुग्णांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गरोदर स्त्रीला संसर्गित आजार सहज आणि लवकर होवू शकणाऱ्या गटात असल्याने, तिने विशेष काळजी घ्यायला हवी. इतर महिला रुग्णांनी काळजी घ्यावी. रुग्णालयातील गर्दी कमी करणे हा महत्वाचा उद्देश देखील आहे. 
लॉक डाऊन कालावधीत शहरातील दवाखान्यात फक्त अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत. कोणत्याही तक्रारी नसलेल्या किंवा कमी जोखीम असलेल्या रूग्णांच्या नियमित प्रसूतीपूर्व तसेच जुनाट स्वरूपाच्या स्त्रीरोगविषयी तक्रारी याविषयीच्या बाह्य रुग्ण भेटी स्त्रीरोग तज्ज्ञांनी या काळात बंद केल्या आहेत. रुटीन किंवा नियमित होणाऱ्या तपासणीसाठी ओपीडीच्या वेळेत लॉक डाऊन कालावधी पुरता फोनवर सल्ला घेवू शकतात. क्लिनिकमधील रहदारी कमी करणे आणि सामाजिक अंतर वाढविणे हा आहे. तपासणीस जातांना सोबत एकच नातेवाईक असावा.
ताप, सर्दी, खोकला असलेल्या रुग्णाने तपासणीस येण्याआधी फोनवर संपर्क साधणे जरुरीचे आहे. तसेच मास्क लावल्याशिवाय तपासणीस जाऊ नये. 
आयव्हीएफसाठी असलेल्या महिलांसाठी, ज्यांनी आधीच ओव्हरिअन स्टीम्युलेशनसाठी औषधोपचार घेत आहेत, अशा जोडप्यांनी डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर या काळात पुढील उपचार करावेत. घरातच राहा सुरक्षित राहा निरोगी राहा, असे आवाहन संघटनेतर्फे अध्यक्ष डॉ.सुजाता महाजन, डॉ. सारिका पाटील, डॉ.प्रियंवदा महाजन, डॉ.तुषार नेहेते, डॉ.वैशाली चौधरी, डॉ.संदीप पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here