<
रुग्णसेवा नियमित सुरु ठेवा – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे
जळगाव-(जिमाका वृत्तसेवा)-कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत नागरीकांची गैरसोय होऊ नये याकरीता खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपली रुग्णसेवा बंद न करता नियमित सुरु ठेवावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.
लॉकडाऊनच्या काळात अनेक खाजगी डॉक्टर आपले दवाखाने बंद ठेवत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा नियोजन भवनात शहरातील सर्व खाजगी डॉक्टरांची बैठक पार पडली यावेळी डॉ. बोलत होते. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रदिप जोशी, सचिव डॉ. धर्मेंद्र पाटील व खाजगी डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले, खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवल्यामुळे साधा थंडी, ताप, खोकल्यासाठी रुग्ण जिल्हा रुग्णालयात रुग्ण येत आहे. त्यामुळे सिव्हीलमध्ये गर्दी वाढत आहे. दवाखाने सुरू ठेवा, त्यांच्यावर उपचार करा. ज्या रुग्णाला कोरोना’ सदृष्य लक्षणे असल्याचे आढळून आले तरच त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवा. साध्या रुग्णांवर स्थानिक पातळीवरच उपचार होणे आवश्यक आहे. जेणेकरुन आजार वाढणार नाही त्यामुळे आपले दवाखाने सुरूच ठेवा.
यावेळी आय. एम. ए. च्या पदाधिकाऱ्यांनी दवाखाने सुरू ठेवायला व नर्सिंग स्टाफला दवाखान्यात येण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले असता त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी डॉक्टरांना दिले. तसेच स्टाफला दवाखान्यात येताना अडचण येवू नये यासाठी त्यांना ओळख पत्र द्या. ते त्यांनी गळ्यात घालूनच बाहेर पडायला सांगा. त्यांना पोलिस अडविणार नाही. रिक्षा सुरू आहेत. त्या बंद केलेल्या नाही. एकावेळी एकाच रुटवर अधिक कर्मचारी येत असतील तर त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करू. येणाऱ्या सर्व अडचणी प्रशासन सोडविल. दवाखान्यात हात धूण्यासाठी बेसीन बसवा, सॅनिटायझरचा वापर करा, रुग्णांना सोशल डिस्टन्स राखूनच दवाशान्यात बसवा स्टाफला मास्क वापरायला सांगा. वापरलेले मास्क इतरत्र टाकू नका. अशा सुचनाही जिलहाधिकारी यांनी दिल्यात.
आय.एम.ए.चे पदाधिकारी यांनीही कोरोनो’बाबत शासनाला सर्व प्रकारची मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले तसेच गरज भासल्यास बेड, व्हेंटिलेटर, मॉनिटरही उपलब्ध करुन देवू. याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, की सध्या जिल्हा रुग्णालयात कोरोना’ संशयितांसाठी 20 बेड राखीव ठेवले आहे. गोदावरी रुग्णालयातही व्यवस्था होत आहे. शहरात विविध ठिकाणी आवश्यक त्या सुविधांसह 500 बेडची तयारी आहे. शासकीय वसतिगृहांची पाहणी करून त्यातही व्यवस्था केली जात आहे. त्या उपरही काही अडचण आली तर खासगी डॉक्टरांची मदत घेवू. यावेळी सर्व डॉक्टरांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.