<
विरोदा(किरण पाटील)- यावल रावेर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अनेक नागरिक, तरुण मुले हेतुपुरस्कर संचारबंदीचे उल्लंघन करून घोळक्याने फिरणे, गर्दी करणे असे प्रकार नित्य घडत असल्याने ही बाब गंभीर असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घातक असल्याने संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश कोरोना विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी ‘इन्सिडेंट कमांडर’ म्हणून घोषित झालेले फैजपूर उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी आज दि. ३१ रोजी काढले आहेत. या आदेशान्वये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केलेली आहे मात्र या संचार बंदी उल्लंघन होत असल्याने ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती समिती स्थापन करण्यात आली आहे त्यामध्ये गावाचे सरपंच हे अध्यक्ष तर गावचे पोलीस पाटील सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रावेर यावल तालुक्यातील सर्व ग्रामसेवक सरपंच व पोलीस पाटील यांना या आदेशान्वये आदेश करण्यात आला आहे की, गावातील जे लोक वारंवार संचारबंदीचे उल्लंघन करीत असतात अशा लोकांची नावे नोंदवहीत नोंदवून त्याचा दैनंदिन अहवाल संबंधित गावाच्या ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील यांच्या संयुक्त स्वाक्षरीने इकडील कार्यालयाच्या ईमेल वर सायंकाळी सहा वाजेच्या आत माहिती पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल असे सूचित करण्यात आले आहे.