<
जळगांव(चेतन निंबोळकर)- कोरोनाचा धोका दिवसेंदिवस अधिकच वाढत असताना काही लोकांना त्याचं गांभीर्य अजूनही कळलेलं नाही. संचारबंदी जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात येणारे रस्ते अत्यावश्यक सेवा वगळून अन्य वाहनांसाठी बंद करण्यात आले आहे. तसेच काही लोक शासनाचे नियम धाब्यावर बसवत बाहेर इतर जिल्ह्यातून व राज्यातून स्थलांतर करताना दिसत आहे. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी जळगांव जिल्ह्याची सुरक्षा यंत्रणा सतर्क होऊन जिल्ह्यातील विविध ३० ठिकाणी नाकाबंदी(सीमाबंदी) करण्यात आली आहे.
तसेच जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने दिवस रात्र पोलिसांची गस्त वाढविण्यात आली. जळगांव जिल्ह्यात जरी कोरोनाचा प्रभाव जास्तीचा नसला तरी पुढील काही दिवस संकटाचे असल्याने तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध ३० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेचे दळण वळण अखंडीत ठेवण्यासाठी पोलीस विभागाचा गाभा समजला जाणारा बिनतारी संदेश विभाग (वायरलेस यंत्रणा) देखील सज्ज करण्यात आला आहे. तसेच वायरलेस विभागाचे पो.नी. आय.आय.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक पुजारी, अमित माळी, संजय महाजन, साहेबराव खैरनार, राजेंद्र सोनवणे, जी.जी.खैरनार, पो.कॉ. अलीम शेख, निलेश चव्हाण, तोडकर, प्रवीण भिसे, अनिल उके यांनी जिल्हा सुरक्षेच्या दृष्टीने अथक परिश्रम घेऊन वायरलेस यंत्रणा कार्यान्वित करुन सज्ज ठेवली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने जिल्हा पोलीस दल व वायरलेस यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.