जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशभरात 23 मार्चपासून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाला आहे. जनतेला या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा, यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहे. त्याचअनुषंगाने केंद्र शासनाने विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्र शासनाच्या 24 मार्च, 2020 च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये किराणा दुकाने तसेच औषधी दुकाने लॉकडाऊनच्या काळात कार्यरत राहतील असे नमूद केले आहे.
जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या तरतूदीनुसार अन्नधान्य व औषधे यांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात आलेला आहे. असे असतांनाही काही किराणा दुकाने व औषधांची दुकाने लॉकडाऊनच्या काळात बंद असल्याचे व त्यामुळे सध्या चालू असलेल्या अशा दुकानांवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे त्याठिकाणी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीतपणे पुरवठा करता यावा यासाठी सर्व किराणा व औषध दुकानदारांनी आपली दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवावीत. तसेच आवश्यकतेनुसार सदरची दुकाने 24 तास चालू ठेवण्याचे आदेश जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 (2) च्या तरतूदीनुसार निर्गमित करण्यात आलेले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करण्यांवर कारवाई करण्याचे अधिकार किराणा दुकानांच्या बाबतीत पुरवठा विभागाचे निरीक्षक व त्यावरील अधिकारी आणि पोलीस तर औषधी दुकानांच्या बाबतीत अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक व त्यावरील अधिकारी आणि पोलीस यांना राहतील. असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सहसचिव चारूशीला तांबेकर यांनी एका परिपत्रकान्वये कळविले आहे.