विरोदा(प्रतिनिधी)- येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या एकका कडून लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्याना स्वखर्चाने मेडिकल मास्क चे वाटप केले. संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने फैलावत असतानाच भारतातही आता या विषाणूने पाय पसरायला सुरुवात केली आहे. भविष्यातील धोका ओळखून डी जी एन सी सी, दिल्ली यांच्यावतीने भारत सरकारला एनसीसी कॅडेट्स व एन सी सी अधिकारी स्वयंसेवक म्हणून देशाच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत सक्रिय सहभाग देतील असे आश्वासन दिले. त्याचाच परिपाक म्हणून धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी व 18 महाराष्ट्र बटालियन चे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशिल बाबर, प्रशासकीय अधिकारी मेजर सुशील कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयाच्या एनसीसी एककाचे अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, सावदा येथे स्वखर्चाने मास्कचे वाटप केले व यासोबत स्वतःची काळजी घेण्याची विनंती केली. यावेळी बँकेचे कॅशियर संजीव मुरलीधर चौधरी तसेच अनिल गोविंदा धनगर, स्वप्निल शशिकांत तायडे आदि कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाचे बँकेकडून कौतुक होत असतानाच प्रत्येक नागरिकाने आपल्या परीने या आपात्कालीन परिस्थितीत जे काही सहकार्य करता येईल ते करावे सोबत स्वतःची काळजी घेत परिसरातील गरीब, हातमजूरी करणारे, भिकारी यांच्यासाठी भोजन व जीवनावश्यक वस्तू रूपाने किव्हा पैश्यांच्या स्वरूपात प्रशासनाला मदत द्यावी असे आवाहन प्रांताधिकारी मा डॉ अजित थोरबोले यांनी केले आहे. यावेळी एनसीसी एककाचे सुमारे 30 कॅडेट्स यांनी माय गव्हर्नरमेंट अँप वर स्वयंसेवक म्हणून कोरोना विषाणूच्या या लढाईत स्वयंस्फूर्तीने नोंदणी केली असून देशाच्या सुरक्षिततेसाठी जे काही करता येणे शक्य असेल ते करण्याचा मानस व्यक्त करीत पुढील कामासंबंधी लवकरच बटालियन कडून आदेश पारित होईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल असे लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी कळविले आहे.