<
10 एप्रिलपासून होणार मोफत तांदुळ उपलब्ध, 11 हजार 475 शिधापत्रिकाधारकांनी घेतले;पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 6 – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये. यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. 1 ते 6 एप्रिल, 2020 या सहा दिवसात जळगाव जिल्ह्यातील 3 लाख 11 हजार 207 शिधापत्रिका धारकांना तब्बल 6 हजार 358 मे. टन अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती जळगावचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असून एकूण 5 लाख 97 हजार 198 रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 27 लाख 71 हजार 251 इतकी आहे. या लाभार्थ्यांना 1 हजार 939 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. माहे एप्रिल 2020 साठी अंत्योदय योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रति कार्ड 23 किलो गहू , 1 रूपये किलो दराने ज्वारी 3 किलो आणि 3 रुपये किलो दराने प्रति कार्ड 9 किलो तांदूळ दिला जात आहे तर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना 2 रु किलो दराने प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रु किलो दराने प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जात आहे.
जळगाव जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे 4 हजार 68 क्विंटल गहू, 2 हजार 292 क्विंटल तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे 11 हजार 475 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहेत त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रति लाभार्थी प्रति महीने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्डधारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रति व्यक्ती 5 किलो तांदुळ 9 एप्रिलनंतर कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर योजनेकरिता तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम, मनमाड यांचेकडून प्राप्त करून घेतले जात असुन 10 एप्रिलपासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरू करण्यात येणार आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जुनमध्ये सुध्दा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई
जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्यादराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैधमापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.