<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 8 – राज्यात 13 मार्च, 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार साथरोग अधिनियम, 1897 ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. साथरोग अधिनियम 1897 च्या खंड 2 ते 4 नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासन राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी नियम प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. व या नियमांना महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 असे संबोधण्यात आले आहे.
साथरोग अधिनियमाच्या खंड 2 (1) नुसार आयुक्त, आरोग्य सेवा, संचालक, आरोग्य सेवा-1 संचालक आरोग्य सेवा-2, संचालक, वैद्यकीयय शिक्षण व संशोधन सर्व विभागीय आयुक्त महसूल विभाग, सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त हे सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता पोलीस आयुक्त यांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी ते सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
ही अधिसूचना राज्यात साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती निवारण कायदा 2005 लागू असेपर्यंत अंमलात राहील. असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी एका शासकीय परिपत्रकान्वये कळविले आहे.