<
मुंबई, दि. ८: राज्यात तालुकास्तरावर ‘इंडियन मेडिकल असोशिएशन’च्यावतीने (आयएमए) ‘रक्षक’ क्लिनिक सुरू करण्यात येणार असून मोठ्या शहरांमध्ये मोबाईल क्लिनिक देखील सुरू करण्याचे आश्वासन ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे मात्र दुसरीकडे रुग्ण बरे होऊन त्यांना घरी देखील सोडण्यात येत आहे. सध्या १२० रुग्णांना डिस्चार्ज दिल्याचे त्यांनी संगितले.
मुंबईतील धारावी भागात लॉकडाऊन प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता असून सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जेथे जास्त रुग्ण आढळून येत आहेत. तेथे नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करावे, असे सांगतानाच मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरण्याचे बंधनकारक केल्याचे त्यांनी सांगितले. राज्य कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नसून याबाबत आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून तसे घोषित केले जाते, असेही आरोग्यमंत्र्यांनी संगितले.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असताना खासगी दवाखाने सुरू करावे यासाठी आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी आज इंडियन मेडिकल असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आयएमएच्यावतीने शहरी भागात मोबाईल आणि कम्युनिटी क्लिनिक तर ग्रामीण भागात रक्षक क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याक्लिनिक मध्ये ओपीडी सुरू करण्यात येईल. राज्य शासनाकडून डॉक्टरांच्या सुरक्षेची आवश्यक ती साधने पुरविण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाच्या संकटकाळात सामान्य जनतेला खासगी रुग्णालयातूनही उपचार मिळावे अशी अपेक्षा यावेळी आरोग्यमंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.