<
जळगाव(प्रतिनिधी)- व्हाट्सअपचा उपयोग आपण याआधी फक्त चॅटिंग किंवा मार्केटिंग साठी करत होतो, पण व्हाट्सअपच्या माध्यमातून शिक्षण ते पण शालेय, नक्कीच न पटण्यासारखं आहे ना? पण होय हे शक्य आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी आहे. सगळीच लोक आपल्या घरात बंदिस्त होऊन बसले आहेत. अश्यातच मुलांचे शैक्षणिक हित लक्षात घेता शहरातील उज्ज्वल स्प्राउटर इंटरनॅशनल स्कूलने आपल्या विध्यार्थ्यांकरीता व्हाट्सअपच्या माध्यमातून डिजिटल शाळा सुरु केलीय. ज्यात विध्यार्थ्यांना शिक्षक ऑडिओ तसेच व्हिडीओच्या माध्यमातून रोज आपल्या विषयाशी संबंधित आपले ऑडिओ व व्हिडीओ विद्यार्थ्यांना वर्गाच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये रोज सकाळी वेळापत्रका प्रमाणे पाठवून आपले विषय शिकवित आहेत. त्याचप्रमाणे त्यांना गृहपाठ देऊन त्यांच्याकडून सराव करुन घेतला जात आहे. या अश्या अनोख्या उपक्रमामुळे विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळत आहे. त्याचप्रमाणे विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग होऊन मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरीता उज्ज्वल स्प्राउटर इंटरनॅशनल स्कूल आपल्या विद्यार्थ्यांकरीता “Task Through Mask” हा उपक्रम राबवत आहे. ज्यात विध्यार्थ्यांना रोज नवनवीन टास्क दिले जातात जसे, रद्दी पेपर पासून खेळणे बनविणे, नाटक सादर करणे, घरातल्या घरात पिकनिकचे आयोजन करणे इ. जी त्यांना सायंकाळी सहा वाजेच्या अगोदर पूर्ण करुन त्याचा ऑडिओ किंवा फोटो काढून शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठवायचा असतो, वर्गनिहाय प्रत्येकी तीन असे उत्कृष्ट टास्कचे फोटो हे शाळेच्या फेसबुक पेजवर शेअर केले जातात. विशेष म्हणजे विद्यार्थ्यानी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिला असून मोठया संख्येने विद्यार्थी आपले कलागुण सादर करुन पाठवून या लॉकडाउन च्या परिस्थितीतही भरभरून आनंद घेत आहेत. सदर उपक्रमाची संकल्पना ही शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी भदादे यांची असून शाळेच्या अध्यक्षा अनघा गागडणी व विश्वत प्रवीण गागडणी यांचे मार्गदर्शन लाभले, तर या उपक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.