<
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी अखेर ८८ तासांनंतर सुरू करण्यात आली. स्पाइसजेटचे विमान मुख्य धावपट्टीवरून घसरल्याने सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्रीपासून ही धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी अखेर ८८ तासांनंतर सुरू करण्यात आली. स्पाइसजेटचे विमान मुख्य धावपट्टीवरून घसरल्याने सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्रीपासून ही धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती. धावपट्टी बंद असल्याने तीन दिवसांत २५० हून अधिक विमाने रद्द झाली. ३५०हून अधिक विमाने अन्यत्र वळविण्यात आली. तर शेकडो विमानांना विलंब झाला. त्याचा हजारो प्रवाशांना फटका बसला.
सोमवारी रात्रीच्या धो-धो पावसात स्पाइसजेटचे जयपूर-मुंबई विमान खाली उतरताना मुख्य धावपट्टीवरून घसरून चिखलात फेकले गेले होते. हे विमान एअर इंडियाच्या सहकार्याने बुधवारी दुपारीच बाहेर काढण्यात आले. पण विमानाचे समोरील चाक व गिअर बॉक्स पूर्णपणे खराब झाल्याने ते हलविण्यात असंख्य अडचणी होत्या. अखेर शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता हे विमान दोन अत्याधुनिक ट्रॉलींच्या सहकार्याने बाजूला करण्यात विमानतळ प्रशासनाला यश आले. त्यानंतर दुपारी ४.१० दरम्यान धावपट्टी पूर्ववत सुरू झाली. दरम्यान, ही धावपट्टी बंद असल्याने एअर इंडियाच्या मुंबई-नेवार्क विमानाला शुक्रवारी तब्बल ११ तासांचा विलंब झाला. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली होती.